esakal | नांदेड जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीची काॅग्रेसची जबाबदारी सावंत, राजूरकर, शिंदे यांच्यावर 

बोलून बातमी शोधा

file photo}

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आपले विश्वासु सहकारी माजी मंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजूकर , काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे

नांदेड जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीची काॅग्रेसची जबाबदारी सावंत, राजूरकर, शिंदे यांच्यावर 
sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाची संस्था आलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणूकीची काॅग्रेसने जय्यत तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीची जबाबदारी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आपले विश्वासु सहकारी माजी मंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजूकर , काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. जिल्ह्यातील राजकीय चित्र पाहता काही जागा बिनविरोध निवडूण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणूकची प्रक्रिया सुरु झाल्याने राजकीय घडामोडी, मोर्चे बांधणी सुरु केली आहे. या निवडणुकीत मतदान संख्या कमी असल्यामुळे प्रत्येक मत 'किमती' आहे. हे किमती मत आपल्या पदरात व पॅनलला पडण्यासाठी जोरदार फिल्डींग लावावी लागणार आहे. शिवाय सोळा संचालक हे तालुकानिहाय निवडून देण्यात येणार आहेत. त्यामुळे त्या भागातील स्थानिक आमदारांची महत्त्वाची भूमिका ठरणार आहे.

मागील निवडणुकीत राजकीय समिकरणे वेगळी होती. जिल्ह्यातील काॅग्रेसचे विरोधक एकत्र येऊन महाराष्ट्र आघाडी केल्याने काॅग्रेसला पाच जागांवरच समाधान मानावे लागले होते. पण यंदाच्या निवडणुकीचे चित्र वेगळे आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे तर जिल्हात पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे राष्ट्रवादी काॅग्रेस व शिवसेना यांच्याशी चांगले संबंध आहेत. या पार्श्वभूमीवर काॅग्रेस निवडणुकीच्या तयारीला लागली आहे.

पालकमंत्री अशोक चव्हाण यांची जिल्ह्याच्या राजकारणवर पकड आहे. त्यांनी या निवडणुकीची जबाबदारी त्यांचे विश्वासु सहकारी माजी राज्यमंत्री डी. पी सावंत, आमदार अमर राजूकर, काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ही निवडणुक काॅग्रेस स्वतंत्र निवडणूक लढविणार की महाविकास आघाडीचा धर्म पाळत शिवसेना, राष्ट्रवादी काॅग्रेसला सोबत घेते या बाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

जिल्ह्यातील काही भागात काॅग्रेसचे, काही भागात शिवसेना तर काही भागात राष्ट्रवादी काॅग्रेस व भाजपची शक्ती आहे. जिल्ह्यात विरोधी पक्षाची भूमिका भाजप व खासदार प्रताप पाटील चिखलीकर बजावत आहेत. ते हा किल्ला एकाकी लढत आहेत. या निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. काॅग्रेसने तयारी सुरु केली आहे तर ईतर पक्षांनी आद्यप आपली भूमिका जाहीर केली नाही.

संपादन - प्रल्हाद कांबळे