esakal | औंढा नागनाथच्या प्राचार्याकडून नांदेडच्या ज्येष्ठ नागरिकास बेदम मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मालेगाव रस्त्यावरील अयोध्यानगरीत घडली. याप्रकरणी प्राचार्य विजय कानोटो याच्याविरुद्ध भाग्यनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

औंढा नागनाथच्या प्राचार्याकडून नांदेडच्या ज्येष्ठ नागरिकास बेदम मारहाण

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : औंढा नागनाथ (जिल्हा हिंगोली) येथील एका महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्राचार्याने शेजारी असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यासह त्यांच्या वृद्ध पत्नीस बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी (ता. २८) सकाळच्या सुमारास मालेगाव रस्त्यावरील अयोध्यानगरीत घडली. याप्रकरणी प्राचार्य विजय कानोटो याच्याविरुद्ध भाग्यनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नांदेड शहराच्या तरोडा (खु) भागातील गजानन परिसरात असलेल्या अयोध्यानगरीत त्र्यंबक सूर्यभान काकडे (वय ७९) हे सेवानिवृत्त आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांच्या घराच्या शेजारी राहणारा व औंढा नागनाथ येथील एका महाविद्यालयात कार्यरत असलेला प्राचार्य हा नेहमी वाद करत असतो. प्राचार्य हा विविध संस्था, संघटनांशी संबंधित असून त्याची या परिसरात चांगली ओळख आहे. गुरुवारी (ता. २८) सकाळी साडेनऊच्या सुमारास श्री. काकडे हे आपल्या घरासमोर उभे होते. यावेळी प्राचार्य विजय कानोटे यांनी दुचाकी बाजुला घेण्याचा कारणावरुन श्री. काकडे यांच्याशी वाद घालून त्यांना शिवीगाळ सुरु केली. एवढेच नाही तर त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. यात त्यांच्या हाताला जबर दुखापत झाली आहे. पतीला सोडविण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नीलासुध्दा शिविगाळ करुन मारहाण केली. तसेच माझ्या वाटेला पुन्हा याल तर ठार मारण्याची धमकी दिली. 

गंभीर जखमी झालेल्या श्री. काकडे यांना शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जखमी त्र्यंबक काकडे यांच्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाताला जबर दुखापत व मुका मार असताना पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या या भुमिकेवर जखमी श्री. काकडे यांच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे.