ज्येष्ठ समाजवादी नेते सदाशिवराव पाटील होते सदाबहार व्यक्तीमत्व

प्रमोद चौधरी
Sunday, 13 September 2020

ज्येष्ठ समाजवादी नेते सदाशिवराव पाटील यांचे शनिवारी (ता.१२) रात्री निधन झाले. त्यांच्याबद्दलच्या आठवणींना प्रा. राजाराम वट्टमवार यांनी उजाळा दिला.

नांदेड : मराठवाड्याचा विकास होण्याच्या दृष्टीने नांदेडमध्ये विरोधी पक्षाचा मोठा गट होता. त्यामध्ये सुधाकरराव डोईफोडे, सदाशिवराव पाटील, रामेश्वर बियाणी, नंदकुमार देव, ॲड. राधाकिसन अग्रवाल, श्यामराव बोधनकर आदींचा त्यामध्ये समावेश होता. सदाशिवराव पाटलांची विचारधारा, भाषण देण्याची पद्धत जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखीच होती. त्यामुळे आपल्या भाषणातून ते प्रत्येकाला जिंकून घ्यायचे, असे हे व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेल्याचे दुःख होते, अशी प्रतिक्रिया प्रा. राजाराम वट्टमवार यांनी दिली.  

सदाशिवराव पाटील यांच्यासोबतच्या आठवणी सांगताना प्रा. वट्टमवार म्हणाले की, १९६०-६२ च्या काळात राष्ट्रसेवा दलाची शाखा गाडीपुरा भागात चालायची. त्या ठिकाणी सदाशिवराव नेहमी यायचे. त्यावेळी राष्ट्रसेवा दलाचा शाखानायक म्हणून मी काम करत होतो. आणि माझ्या हाताखाली शीतलसिंग गुलाबसिंग ठाकूर होते. ते अतिशय विनम्र, नम्रतेने सदाशिवरावांना बसायला सांगत. त्यांचा आदर करत असत. त्यामुळे सदाशिवराव आम्हा सर्वांना आनंद देवून टाकायचे.  

हेही वाचा - नांदेड - शनिवारी ३७७ रुग्ण कोरोनामुक्त, पॉझिटिव्ह रूग्ण ३८४; आठ जणांचा मृत्यू

नांदेडची नगरपालिका विरोधी पक्षाच्या तब्यात यायला पाहिजे, असा डावपेच सदाशिवरावांनी त्यावेळी केला होता. प्रयत्न करून त्यांनी बहुमत सभागृहात दाखवून दिले. पहिले विरोधी पक्षाचे अध्यक्ष म्हणून राधाकृष्ण अग्रवाल यांना केले. कारण या ग्रुपचे प्रेशर खूप होते. निष्कलंक, निःस्वार्थी, निर्भय असा हा ग्रुप होता. तुरुंगात जायलाही हा गट तयार होता. सत्ताधारी पक्षांना तुल्यबळ अशा या व्यक्ती होत्या. सदाशिवराव आपल्या भाषणांमधून समोरच्याला रोमांचित करायचे. जॉर्ज फर्नांडिस यांच्या व्यक्तिमत्वासारखेच सदाशिवराव पाटलांचेह व्यक्तिमत्व होते, असेही प्रा. वट्टमवार सांगतात.   

हे देखील वाचा - नांदेड : रेल्वेमध्ये पार्सलची सुद्धा ऍडव्हान्स बुकींग करता येणार, नवीन सुविधेचे स्वागत

सदाशिवराव पाटील मराठवाडा विकास आंदोलनात नेहमीच भाग घ्यायचे. विशेष म्हणजे राष्ट्रसेवादलाच्या मध्यवर्ती समितीचे पाटील विश्वस्त (ट्रस्टी) होते. त्यांचे व्यक्तिमत्व पारदर्शी असल्यामुळे राष्ट्र सेवादलातील कार्यकर्त्यांना मोठी प्रेरणा मिळत होती. बैठकीच्या वेळी प्रत्येक कार्यकर्त्याला घरून जेवणाचा डबा आणायला सांगायचे. बैठकीनंतर हे डबे सर्वांनी एकत्रित खायचे. कारण त्यांना हॉटेलमध्ये जेवायचा जाणे आवडतच नसत. ताराबाई परांजपे यांच्याकडून मी नेहमीच बैठकीला डबा घेवून जायचो, अशी आठवणही प्रा. वट्टमवार यांनी सांगितली.   

येथेही क्लिक करा - Video-शासनाच्या दडपशाही धोरणाचा आयएमएतर्फे नांदेडमध्ये निषेध

ज्येष्ठ नेते बापूसाहेब काळदाते जेव्हा केव्हा नांदेडला येत, तेव्हा ते सदाशिवरावांच्या घरीच थांबायचे. सदाशिवरावांच्या शब्दाला धार होती. नरहर कुरुंदकर, शंकरराव चव्हाण, सुधाकरराव डोईफोडे, पद्माकरराव लाटकर, इतिहास संशोधक चांगोले, चित्रकार विश्वास वसेकर असे तुल्यबळ व्यक्तिंसोबत सदाशिवरावांचा नियमित वावर असायचा. आणीबाणीच्या काळात सदाशिवराव तुरुंगातही गेले होते. त्यांच्या घरी आर्थिक दुर्बलता होती, तरीही जेवल्याशिवाय ते कुणालाही घरून जावू द्यायचे नाही. एकदा त्यांच्याकडे मोठी व्यक्ती आली होती. तेव्हा त्यांनी रद्दी जमा करून ती विकली, आणि पाहुण्याला जेवू घातले, असे हे व्यक्तिमत्व होते.  

बोले तैसा चाले...
सदाशिवराव पाटील सत्यवादी, समाजवादी होते. राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्यांना ते सतत मानवतेचा विचार द्यायचे. ‘बोले तैसा चाले’ अशी एक म्हण आपल्याकडे आहे. ती सदाशिवरावांना तंतोतंत लागू होईल. 
- प्रा. राजाराम वट्टमवार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior Socialist Leader Sadashivrao Pati Pass Away Nanded News