खळबळजनक घटना - नांदेडला हॅकर्सनी मारला साडेचौदा कोटींवर डल्ला; पोलिसात तक्रार

file photo
file photo
Updated on

नांदेड - नांदेड शहरातील आयडीबीआय बॅंकेतील शंकर नागरी सहकारी बॅंकेच्या खात्यात असलेले १४ कोटी ५० लाख रुपये हॅकर्सनी ‘एनईएफटी’ आणि ‘आरटीजीएस’च्या माध्यमातून गायब केल्याची घटना घडली असून याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. सदरील घटना बुधवारी (ता. सहा) दुपारनंतर उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. 

शहरातील नवा मोंढा येथील शंकर नागरी सहकारी बॅंकेचे वजिराबाद भागातील आयडीबीआय बॅंकेत खाते आहे. या खात्यातील १४ कोटी ५० लाख रुपये एनईएफटी आणि आरटीजीएसच्या माध्यमातून हॅकर्संनी लंपास केल्याची माहिती बुधवारी दुपारी मिळाली. याबाबतची माहिती कळाल्यानंतर शंकर नागरी सहकारी बँकेचे मुख्य व्यवस्थापक विक्रम राजे यांनी नांदेड परिक्षेत्राचे विशेष उपमहानिरीक्षक, नांदेडचे पोलिस अधीक्षक आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. 

संशयास्पदरित्या झाले पैसे वळते
शंकर नागरी सहकारी बॅंकेचे आयडीबीआयच्या वजिराबाद शाखेतून अंदाजे चौदा कोटी ५० लाख रुपये एनईएफटी आणि आरटीजीएस द्वारे संशयास्पदरित्या काही व्यक्तींच्या खात्यावर वळती करण्यात आले आहेत. त्यामुळे त्याची चौकशी करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ही घटना ता. दोन डिसेंबर २०२० ते ता. तीन जानेवारी २०२१ या दरम्यान घडली आहे. याबाबत आयडीबीआय बॅंकेशी पत्रव्यवहार केला आहे. तरी या घटनेची दखल घेऊन त्याची सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच शंकर नागरी सहकारी बॅंकेतील ठेवीदार, खातेदारांचा पैसा सुरक्षित असून कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. त्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे शंकर नागरी बॅंकेतर्फे सांगण्यात आले. 

आमचा संबंध नाही - ‘आयडीबीआय’
याबाबत ‘आयडीबीआय’ बॅंकेच्या वजिराबाद शाखेचे व्यवस्थापक रुपेश कोटगिरे यांना विचारले असता त्यांनी घडलेल्या प्रकाराशी आमच्या बॅंकेचा संबंध नसल्याचे सांगितले. त्यांच्या बॅंकेतील असलेल्या खात्याशी तसेच सॉफ्टवेअर संदर्भातील काही अडचणी असू शकतात. त्याचा आमच्या बॅंकेशी काही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. 


चौकशी सुरू - पोलिस अधीक्षक शेवाळे
दरम्यान, याबाबत पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी शंकर नागरी सहकारी बॅंकेच्या व्यवस्थापकांची आमच्याकडे लेखी तक्रार आली असल्याचे सांगितले. या तक्रारीची आम्ही चौकशी करून पुढील कार्यवाही करू, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com