नांदेडच्या शिवाजीनगर पोलिसांची कारवाई; युवकास अटक, पिस्तुलसह दोन जिवंत काडतूस जप्त 

प्रल्हाद कांबळे
Saturday, 16 January 2021

मागील काही काळात नांदेड शहरात शिवाजीनगर, वजिराबाद, विमानतळ, भाग्यनगर, इतवारा आणि नांदेड ग्रामीण या भागात बऱ्याच गुन्हेगारांनी आपल्या जवळ पिस्तूल, खंजीर बाळगून मिळून आल्याचे गंभीर गुन्हे पोलिस दप्तरी दाखल झालेत.

नांदेड : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच शहरात पिस्तूल दाखवून दहशत पसरविणार्‍या एका आरोपीस शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतूस जप्त केले. विक्रांत राजेंद्र गजभारे राहणार वसरणी (ता. नांदेड) असे आरोपीचे नाव आहे. त्याची रवानगी कारागृहात झाली.

मागील काही काळात नांदेड शहरात शिवाजीनगर, वजिराबाद, विमानतळ, भाग्यनगर, इतवारा आणि नांदेड ग्रामीण या भागात बऱ्याच गुन्हेगारांनी आपल्या जवळ पिस्तूल, खंजीर बाळगून मिळून आल्याचे गंभीर गुन्हे पोलिस दप्तरी दाखल झालेत. अशा प्रकारची गुन्हेगारी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांनी सर्व शहरातील संबंधित ठाणेदारांची एक महत्त्वाची बैठक घेऊन सूचना दिल्या. 

हेही वाचा पोलिस कोठडी : खतगाव शिवारातील खुनाचे रहस्य उलगडले! प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून...!!

शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनीही कंबर कसली आहे. वरिष्ठ पोलिसांच्या आदेशान्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक सक्रिय झाले. पोलिस निरीक्षक अनंत नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक डोके यांनी आपल्या सहकार्‍यांसह पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त सुरु केली. त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन संशयास्पद फिरणाऱ्या एका युवकास वसंतनगर, नवामोंढा परिसरातून ताब्यात घेतले. 

नांदेडच्या महत्वाच्या घटना घडामोडीसाठी येथे या

त्याच्याकडे विनापरवाना गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस सापडले. त्याच्याकडील ४० हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. विक्रांत रागजभारे त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात माणिक डोके यांच्या फिर्यादीवरुन भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक डोके, पोलिस हवालदार संजय मुंडे, दिलीप राठोड, रामकिशन मोरे, लियाकत शेख, दत्तात्रय कांबळे, राजकुमार डोंगरे, काकासाहेब जगताप, मधुकर आवातीरक यांनी परिश्रम घेतले. या पथकाचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कौतुक केले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivajinagar police in Nanded arrested a youth and seized two live cartridges along with a pistol nanded crime news