esakal | धक्कादायक! भाजप खासदाराला एकाच महिन्यात दुसऱ्यांदा झाली कोरोनाची लागण
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर उपचार घेऊन काही दिवसांपूर्वीच कोरोनामुक्त झाले होते. मात्र, दिल्ली येथे संसदेच्या अधिवेशनाला गेल्यानंतर त्यांचा अहवाल सोमवारी (ता.१४ सप्टेंबर) पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. 

धक्कादायक! भाजप खासदाराला एकाच महिन्यात दुसऱ्यांदा झाली कोरोनाची लागण

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून (ता.१४) सुरु झाले. अधिवेशनासाठी येणार्या सर्व खासदारांना कोरोना टेस्ट बंधनकारक करण्यात आली होती. दरम्यान या टेस्टमध्ये २५ खासदार पॉझिटिव्ह आले असून, त्यामध्ये नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच ते कोरोनामुक्त झाले होते. 

भाजपचे नांदेड येथील खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे सात आॅगस्ट रोजी कोरोनाबाधित झाले होते. पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर आणि त्यांच्या वाहनचालकाला कोरोनाची लागण झाली होती. पुत्रावर औरंगाबादेत उपचार सुरु असल्यामुळे प्रताप पाटील चिखलीकरही औरंगाबादेतच क्वारंटाईन झाले होते. त्रास जाणवू लागल्याने त्यांनी स्वॅब तपासणीसाठी दिला असता अहवाल पॉझिटिव्ह आला होता.  त्यामुळे औरंगाबादेत क्वारंटाइन असताना त्यांनी स्वॅब तपासण्यासाठी दिला होता. उपचार घेऊन ते १८ आॅगस्ट रोजी ते कोरोनामुक्त झाले होते. मात्र, दिल्ली येथे संसदेच्या अधिवेशनाला गेल्यानंतर त्यांचा अहवाल सोमवारी (ता.१४ सप्टेंबर) पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. 

हेही वाचा - इथे मरणाचेही भय वाटे...अशी नांदेडला स्मशानभूमीची परिस्थिती...

महाराष्ट्रातील दोन खासदारांचा समावेश
दिल्लीत सुरु झालेल्या संसदच्या अधिवेशनप्रसंगी दोन्ही सभागृहांचे किमान २५ खासदार कोरोनाग्रस्त झाल्याची माहिती दुपारी सर्वत्र पसरली होती. त्यात खासदार चिखलीकर, बुलडाण्याचे खासदार प्रताप जाधव हे दोघे पॉझिटिव्ह आल्याचे ‘एनएनआय’च्या वृत्तात म्हटले होते. याबाबत खासदार चिखलीकर यांना विचारले असता, ‘ऑगस्टमध्ये माझा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यावेळी उपचार घेऊन नांदेडला परतलो, दक्षता घेऊन कामास लागलो. तीन दिवसांपूर्वीच दिल्लीला आलो आहे. तेथे काल कोरोना चाचणी झाली, मात्र त्याचा अहवाल मला अद्याप मिळालेला नाही. स्वीय्य सहायकासही तो मिळालेला नाही’, अशी प्रतिक्रिया दिली. 

हे देखील वाचाच - नांदेड- सोमवारी ३४१ रुग्ण कोरोनामुक्त, ३५३ अहवाल पॉझिटिव्ह; ५८ जणांची प्रकृती गंभीर

नांदेडच्या पुढाऱ्यांना घेरले कोरोनाने
नांदेडच्या राजकीय पुढाऱ्यांना कोरोनाने घेरले आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री, नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण, आमदार मोहन हंबर्डे, आमदार अमर राजूरकर, आमदार माधव पाटील जवळगावकर, उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर, माजी महापौर अब्दुल सत्तार, त्यांचे चिरंजीव नगरसेवक अब्दुल गफार या काँग्रेसच्या पुढाऱ्यांसोबत भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकट पाटील गोजेगावकर, महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्यासह काही पदाधिकारीही कोरोनाबाधित झाले होते.   

माझी प्रकृती ठणठणीत आहे
मी दिल्लीत पुन्हा पॉझिटिव्ह झाल्याची बातमी रात्री आठच्या सुमारास भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कळाली. त्यांच्याकडून माझ्या तब्येतीची विचारपूस केली. प्रकृती उत्तम असून, माझी काळजी करू नका असे मी त्यांना सांगितले आहे.                                                    - प्रताप पाटील चिखलीकर, खासदार नांदेड