
नांदेड येथील सुरमणी धनंजय जोशी यांना नुकतेच मध्यप्रदेश सरकारने ग्वाल्हेर येथील अंतरराष्ट्रीय तानसेन संगीत समारोहात शास्त्रीय गायन सादर करण्यासाठी निमंत्रित केले आहे.
नांदेड: एमजीएम महाविद्यालयातील पदार्थ विज्ञान विषयाचे प्राध्यापक व गायक सूरमणी धनंजय जोशी यांना नुकतेच मध्यप्रदेश सरकारने ग्वाल्हेर येथील अंतरराष्ट्रीय तानसेन संगीत समारोहात शास्त्रीय गायन सादर करण्यासाठी निमंत्रित केले आहे.
अकबराच्या दरबारातील नवरत्न पैकी असलेले संगीत सम्राट तानसेन यांची कबर ग्वाल्हेर येथे आहे. त्यामुळे येथे मध्यप्रदेश सरकार तानसेन समारोह या नावाने मागील अनेक वर्षापासून संगीत समारोहाचे आयोजन करत आहे. येत्या दिनांक २६ ते ३० डिसेंबर दरम्यान या महोत्सवाचे आयोजन ग्वाल्हेर येथे होत आहे. या विश्वविख्यात संगीत संमेलनात नांदेड येथील गायक सूरमणी धनंजय जोशी यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. खरं म्हणजे अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संगीत संमेलनात सहभागी होण्याची धनंजय जोशी यांची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक मोठ मोठ्या संगीत संमेलनात त्यांनी आपली हजेरी लावून रसिकांचे कान तृप्त केले आहेत.
हेही वाचा - नांदेड : भावी कारभारी गाव कारभारात झाले मश्गुल, हॉटेल, बार, चहाटपरी आणि पारावर रंगत आहेत चर्चा
रेडिओ व टेलिव्हिजनचा 'अ' हा उच्च दर्जा धारण करणाऱ्या धनंजय जोशी यांचे प्राथमिक शिक्षण परभणी येथे पंडित कमलाकर परळीकर यांचेकडे झाले. त्यानंतर सतरा वर्षे ते नांदेड येथे पंडित रमेश कानोले यांच्याकडे गुरू-शिष्य परंपरेने गायन शिकले व सध्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक पंडित अजय पोहनकर यांचेकडून त्यांना मार्गदर्शन प्राप्त होत आहे. मागील पंधरा वर्षापासून धनंजय जोशी यांनी अनेक संगीत समारोहात आपला यशस्वी सहभाग नोंदवला आहे. यात उल्लेखनीय म्हणजे अमेरिकेतील न्यू जर्सी येथे पार पडलेल्या विश्व नाट्य संमेलनात संजय जोशी यांच्यासह त्यांनी नाट्यसंगीत रजनी सादर केली.
हे देखील वाचाच - नांदेड जिल्ह्यात वैयक्तिक नळ जोडणीचे कामे तात्काळ पूर्ण करा : वर्षा ठाकूर
तसेच संगीत नाटक अकादमी दिल्ली येथे निशा- रागीणी मैफलीत त्यांनी अनेज दिग्गजांच्या समोर आपले गायन प्रस्तुत करून आपले वेगळेपण दाखवून दिले आहे. ग्वाल्हेर येथील मास्टर कृष्णराव महोत्सवातील त्यांचा सहभाग, भारतातील अनेक मोठ्या शहरातून आय.सी.सी.आर.च्या माध्यमातून त्यांनी सादर केलेल्या मैफिली तसेच स्वरसागर संगीत समारोह पुणे, हरिदास संगीत संमेलन मुंबई, मल्हार फेस्टिवल रायपुर, श्रावण महोत्सव उज्जैन, राष्ट्रीय संगीत संमेलन बेळगाव, सवाई गंधर्व संगीत महोत्सव कुंदगोळ, कुमार गंधर्व संगीत समारोह बेळगाव, घराना संगीत संमेलन इंदोर आदींचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
येथे क्लिक कराच - नांदेडमध्ये नवीन घराच्या बांधकामाला महागाईचे ग्रहण
यासोबतच अनेक मानसन्मानही श्री धनंजय जोशी यांना प्राप्त झालेले आहे. त्यात कर्नाटक सरकारचा बसवराज राजगुरू सन्मान, सुरसिंगार संस्थेचा सूरमणी हा किताब, उत्तर प्रदेशातील बनारस येथील काशी संगीत समाज यांनी प्रदान केलेला संगीत रत्न अलंकरण हा सन्मान, तसेच पंजाब मधील फरीदकोठ येथे त्यांना संगीत कला निधी ही उपाधी मिळालेली आहे. असे असूनही त्यांनी नांदेड शहरालाच आपली कर्मभूमी मानले आहे.