....म्हणून रास्तभाव दुकानावर कारवाईचा बडगा

कृष्णा जोमेगावकर
शनिवार, 23 मे 2020

जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत शासनाने संचारबंदी लागू केली आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिक उपाशी राहू नये यासाठी प्राधान्य कुटुंब, अंत्योदय, केशरी कार्डधारक तसेच शेतकरी कार्डधारक या नियमित कार्डधारकांसह ज्या नागरीकाकडे कार्ड नाही अशा नागरिकांना मोफत धान्य पुरवठा करण्यात येणार आहे.

नांदेड : जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत शासनाकडून नियमित धान्यासह मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे. हा धान्यपुरवठा होताना अनियमितता आढळून येत असल्याने तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा पुरवठा अधिकारी शरद मंडलिक यांनी जिल्ह्यातील आठ स्वस्त धान्य दुकानांचे परवाने निलंबित केले आहेत. धान्य वाटपात पारदर्शकता राखावी अन्यथा कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

नियमीत धान्यासह मोफत धान्य वाटप
जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत शासनाने संचारबंदी लागू केली आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिक उपाशी राहू नये यासाठी प्राधान्य कुटुंब, अंत्योदय, केशरी कार्डधारक तसेच शेतकरी कार्डधारक या नियमित कार्डधारकांसह ज्या नागरीकाकडे कार्ड नाही अशा नागरिकांना मोफत धान्य पुरवठा करण्यात येणार आहे. यासोबतच प्राधान्य कुटुंब कार्डधारक व अंत्योदय कार्डधारकांना तीन महिने मोफत देण्यात येणाऱ्या तांदळाचे वाटप होत आहे. प्रत्येक व्यक्ती पाच किलो याप्रमाणे तांदळाचे वाटप सध्या सुरू आहे. यासोबतच स्थलांतरित मजुरांना कार्ड नसल्यामुळे त्यांना अधिकचे पैसे देऊन धान्य विकत घ्यावे लागत होते. 

हेही वाचा....तब्बल दोन महिन्यानंतर मिळाला सामान्यांना दिलासा

कार्ड नसलेल्यांना मिळणार धान्य
शासनाने ता. १९ मे रोजी आदेश जारी करुन कार्ड नसलेल्या नागरिकांना मोफत तांदूळ देण्यात येणार आहे. त्याचे लाभार्थी निवडण्याचे काम सध्या सुरू आहे. परंतु हे धान्य वाटप होत असताना अनेक ठिकाणी नागरिकाकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये निर्धारित दरापेक्षा अधिक दर आकारणी करणे, दुकानासमोर भाव फलक न लावणे, अनेकांना धान्यापासून वंचित ठेवणे, धान्य कमी देणे याबाबतच्या तक्रारी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या. याबाबत संबंधित तहसिलदाराकडून चौकशी केल्यानंतर दोषी आढळलेल्या जिल्ह्यातील आठ रास्तभाव दुकानदारांवर  निलंबनाची कारवाई केली आहे. 

हेही वाचलेच पाहिजे.... दहा हजारांवर भुकेल्यांना अन्नदान करणारा अवलिया, कोण? ते वाचाच

आठ रास्तभाव दुकानाचा परवाना निलंबीत
किनवट तालुक्यातील अंबाडी येथील श्रीनिवास सोमाजी कयापाक. नांदगाव तांडा येथील केशव रोडा पवार, कोठारी येथील अशोक मेश्राम आणि कंचली येथील जी. के. राठोड यांच्या दुकानाचा परवाना निलंबित केला आहे. या सोबतच नायगाव तालुक्यातील ईकळीमोर येथील हनुमंत लिंगोजी मोरे यांचे रास्तभाव दुकान निलंबित केले आहे. उमरी तालुक्यातील शेलगाव येथील आनंद विठ्ठल कवळे यांचे रास्तभाव दुकान निलंबित केले आहे. बिलोली तालुक्यातील केरुर येथील भास्कर नागोराव तरटे यांचे तसेच नांदेड तालुक्यातील धनेगाव येथील नारायण पांडोजी कवाळे यांचेही रास्तभाव दुकान जिल्हा पुरवठा अधिकारी शरद मंडलिक यांनी निलंबित केले आहे. 

नियमानुसार धान्य वितरण करावे अन्यथा कारवाई
आगामी काळातही शासनाकडून नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी वेगवेगळ्या योजनेतून अल्पदरात तसेच मोफत धान्य पुरवठा करीत आहे. हे धान्य पुरवठा करताना रास्तभाव दुकानदार यांनी शासन नियमानुसार धान्याचे वितरण करावे अन्यथा त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी शरद मंडलिक यांनी दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: .... so a barrage of action on the fair price shop