सोनखेडचे सैराट जोडपे औरंगाबादमधून ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

सोनखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर फौजदार श्री. परिहार यांच्या पथकाने शिताफीने या सैराट जोडप्याला औरंगाबाद येथून ताब्यात घेतले असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर यांनी सांगितले. 

नांदेड :  लोहा तालुक्यातील सोनखेड येथील विजातीय तरुणाने गावातील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले होते. सोनखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर फौजदार श्री. परिहार यांच्या पथकाने शिताफीने या सैराट जोडप्याला औरंगाबाद येथून ताब्यात घेतले असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर यांनी सांगितले. 

लोहा तालुक्यातील सोनखेड- कलंबर रस्त्यावरील दापशेड गावात शनिवारी (ता. १३) सायंकाळी घडली. या प्रकरणामुळे गावातील दोन समूहात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर रविवारी (ता. १४) सकाळी तेथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीला (वय १६) भिन्न धर्मीय तरुणाने फूस लावून पळवून नेले. मुलीच्या पालकाने सोनखेड पोलिसात तक्रार दिल्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा -  पडझड झालेल्या गावात मानवतावादी विचारांची पेरणी, कशी? ते वाचाच

सोनखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

इतवाराचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर, पोलीस उपनिरीक्षक श्री परिहार यांनी रात्री गावात भेट दिली. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सदर तरुणाविरुद्ध सोनखेड पोलिस ठाण्यात अपहरण, अत्याचार आणि बाललैंगीक अत्याचार प्रतिबंधक आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

सैराट जोडपे औरंगाबादमधून अटक

गुप्त माहितीवरून उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील आणि सहायक पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्री. परिहार, कर्मचारी कदम आणि महिला पोलिस श्रीमती गायवाड यांना औरंगाबादयेथे पाठविले. या पथकाने मोबाईल लोकेशनच्या आधारे या सैराट जोडप्याला ताब्यात घेतले. 

येथे क्लिक करा - नांदेडकरांना सोमवारी साखर झोपेतच धक्का, सहा पॉझिटिव्ह

कंधार न्यायालयात हजर करण्यात येणार

सोमवारी (ता. १५) सकाळी या जोडप्याला सोनखेडमध्ये आणल्यानंतर त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. यावेळी पिडीतेच्या म्हणण्यानुसार अत्याचाराची कलम वाढविण्यात येणार आहे. पिडीतेला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून आरोपीला कंधार न्यायालयात हजर करण्यात येत असल्याचे एपीआय मांजरमकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonkhed's Sairat couple arrested from Aurangabad nanded news