सोयाबीन, मुग, उडीदच देईल शेतकऱ्यांना संजीवनी

अभय कुळकजाईकर
Friday, 7 August 2020

जिल्ह्यातील १६ तालुक्यात एकुण सात लाख ४२ हजार ८६१ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून या क्षेत्रापेक्षा अधिक म्हणजेच सात लाख ५५ हजार १८ हेक्टर क्षेत्रावर या वर्षी खरीप हंगामात पेरणी झाली आहे. पेरणीची ही टक्केवारी १०१.६४ एवढी झाली.

नांदेड - खरीप पिकांसाठी वेळेवर आवश्यक असलेला असा मोजका पाऊस गत दहा वर्षात कधी झाला नाही. जिल्ह्यातील मुग, उडीद, सोयाबीन, कापूस आदी खरिपातील पिकांना वेळेवर पावसाचे पाणी मिळाल्यामुळे पिके शेतात डौलाने डोलत आहेत. निसर्गाने अजून दोन आठवडे साथ दिल्यास मूग, सोयाबीन आणि उडीद या पिकांचे विक्रमी उत्पादन जिल्हाभरात होईल, अशा विश्वास जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी व्यक्त केला. या पिकांसाठी आठवडाभरात दोन पाऊस झाले तरी पुरेसे ठरतील असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - सावधान, मराठवाड्यातील पिकांवर किडीचा उद्रेक होतोय 

नांदेड जिल्ह्यात १०१ टक्के पेरणी 
जिल्ह्यातील १६ तालुक्यात एकुण सात लाख ४२ हजार ८६१ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून या क्षेत्रापेक्षा अधिक म्हणजेच सात लाख ५५ हजार १८ हेक्टर क्षेत्रावर या वर्षी खरीप हंगामात पेरणी झाली आहे. पेरणीची ही टक्केवारी १०१.६४ एवढी झाली. जिल्ह्यात सर्वात जास्त देगलूर तालुक्यात सर्वसाधारण खरीप पिकाच्या क्षेत्रापेक्षा १५.३९ टक्क्यांनी अधिक प्रमाणात पेरणी झाली आहे. या खरीप हंगामात जिल्ह्यात ९२० हेक्टर क्षेत्रावर भाताची पेरणी, ज्वारी ३१ हजार ४८१, बाजरी २१, मका ६९१ असे एकुण तृणधान्य ३३ हजार ११३ हेक्टरवर लागवडी खाली आहे. तर तूर ७२ हजार ५१०, मुग २५ हजार ८५९, उडीद पिकाची २६ हजार ९४२ क्षेत्रावर पेरणी झाली आहे. एकुण कडधान्य हे एक लाख २५ हजार ३११ हेक्टर क्षेत्रावर झाले आहे. याची वार्षिक सरासरी १०७.६१ टक्के एवढी आहे. तीळ ४५५ हेक्टर, कारळ २८२ हेक्टर, सोयाबीन तीन लाख ८१ हजार ३७३ हेक्टर, इतर गळीत धान्य ७४ हेक्टर क्षेत्रावर पेरणीखाली आहे.

कापसात मुग, उडिदाचे अंतरपिक झाले फायदाचे
ज्या सोयाबीनने सुरुवातीला काही शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले तेच सोयाबीन आता कोरडवाहू शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आहे. निसर्गाची वेळेवर कृपा आजवर खरीप पिकांना मिळाल्यामुळे सर्वच पिके आता दाटून उभी आहेत. माझ्यासारख्या काही शेतकऱ्यांनी कापसात अंतरपिक म्हणून ७० दिवसात येणारे मुग व उडीदाचे पिक घेऊन बघितले आहे. या अंतरपिकामुळे एरवी कापसात वाढणाऱ्या तणाला चांगला अटकाव बसला असून निंदणीचा खर्च वाचण्याबरोबर उडीद, मुगाच्या पिकातून दोन अधिकचे पैसे आता आमच्या हाती पडतील, असा विश्वास शेतकरी चपाट यांनी बोलून दाखविला.

हेही वाचलेच पाहिजे - मराठवाडा व अन्य विकास मंडळांना मुदतवाढ द्यावी, कशासाठी? ते वाचाच
 

बीबीएफ पद्धतीच्या पेरणीने सोयाबिनला तारले 
सोयाबिन पिकासंदर्भात पेरणीच्या काळात काही मोजक्या शेतकऱ्यांना वेगळा अनुभव जरी आला असला तरी आमच्या या ढोकी शिवारात इथल्या पेरणीच्या पद्धतीमुळे आम्हाला तारल्याची भावना ढोकीचे शेतकरी रंगनाथ लोकेवार यांनी बोलून दाखविली. बीबीएफ (रुंद सरीवरंबा) पद्धतीने सोयाबिनची लागवड करण्याचा सल्ला आम्हाला कृषि अधिकारी प्रकाश पाटील यांनी दिला. त्यानुसार ही लागवड झाल्यामुळे सोयाबिनचे हे पिक हेक्टरी २५ क्विंटलपर्यंत उत्पन्न देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मागील अनेक वर्षात खरीपाचे असे पिक पाहिल्याचे आठवत नाही, असे त्यांनी सांगितले.   

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soybean, mug, urad will give life to the farmers, Nanded news