गुन्हेगारीच्या नासुराचे आॅपरेशन करणार- एसपी प्रमोदकुमार शेवाळे

प्रल्हाद कांबळे
Monday, 28 September 2020

येणाऱ्या काळात जिल्ह्यातील वाढलेल्या गुन्हेगारीच्या नासुराचे आॅपरेशन केल्याशिवाय शांत बसणार नाही. यासोबतच नांदेडकरांना व लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेऊन शहरातील विस्कळीत झालेली वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न करणार

नांदेड : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बाधीत होणार नाही याची काळजी घेतली जाणार असून येणाऱ्या काळात जिल्ह्यातील वाढलेल्या गुन्हेगारीच्या नासुराचे आॅपरेशन केल्याशिवाय शांत बसणार नाही. यासोबतच नांदेडकरांना व लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेऊन शहरातील विस्कळीत झालेली वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर पोलिस अधीक्षक श्री. शेवाळे हे पहिल्यांदाच पत्रकारांशी बोलत होते. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांची उपस्थिती होती. नांदेड जिल्ह्याचे कार्यक्षेत्र मोठे आहे. मराठवाड्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा असून ३६ पोलिस ठाणे कार्यरत आहेत. जवळपास दहा उपविभाग असून जिल्ह्याला तेलंगना, कर्नाटक या राज्याच्या सिमा लागुन आहेत. तसेच जिल्ह्याच्या तेलंगना सिमावर्ती भागात काही काळ नक्षलवादी चळवळी सक्रीय असल्याची नोंद आहे. मात्र सध्या या चळवळीविरुद्ध पोलिस प्रशासनाने ठोस पाऊले उचलले असल्याने मागील काही वर्षापासून नक्षलवादी हिंसक घटना घडल्या नाहीत. अजूनही नांदेड पोलिस दलाची एक तुकडी किनवट येथे कार्यरत आहे. 

हेही वाचाउमरी : बँक चोरीप्रकरणी चोरट्यांना पोलिस कोठडी 

सचखंड गुरुद्वारा व रेणूका देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांचे श्रद्धास्थान

नांदेड जिल्ह्या धार्मिकदृष्ट्या जगभरात प्रसिद्ध आहे. येथे शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंदसिंग यांची समाधी आहे. नांदेड हे शिखांची दक्षिण काशी म्हणून जगभरात ओळखल्या जाते. सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी जगभरातून हजारो शिख भाविक येत असतात. तसेच माहूर येथील रेणूकादेवी मंदीरही प्रसिद्ध आहे. रेणूका देवीचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात. एकंदरीत हे शहर अनेक संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. मला या शहरात नांदेडकरांची सेवा करण्याची संधी मिळाली. नांदेडकरांच्या सुरक्षेची जिम्मेदारी शासनाने माझ्यावर टाकली ती मी पूर्ण ताकदीने पार पाडू असा विश्‍वास श्री. शेवाळे यांनी व्यक्त केला. 

येथे क्लिक करादुर्दैवी घटना : उमरी शिवारात मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू -

गुन्हेगारीच्या नासुराचे आॅपरेशन केल्याशिवाय चैण पडणार नाही

जिल्ह्यातील वाढत चाललेली गुन्हेगारी ठेचुन काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. गुन्हेगारी ही समाजाला लागलेली कीड असून त्या नासुराचे आॅपरेशन केल्याशिवाय चैण पडणार नाही. शहर शांत व सुरक्षीत ठेवण्यासाठी मला व माझ्या पोलिस दलाला नांदेडकरांच्या साथीची गरज आहे. चांगला समाज आणि पोलिस एकत्र आले तर समाजाला लागलेला गुन्हेगारीचा कलंक नेस्तनाबुत झाल्याशिवाय राहत नाही. यासोबतच शहरातील विस्कळीत झालेली वाहतुक सुरळीत करण्यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न करणार आहे. तसेच जिल्ह्यातील महिला, विद्यार्थीनी, जेष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेला बाधा पोहचणार नाही यासाठी नांदेड पोलिस दल कटीबद्ध असल्याचे श्री. शेवाळे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SP Pramod Kumar Shewale will operate on the canker of crime nanded news