उमरी : बँक चोरीप्रकरणी चोरट्यांना पोलिस कोठडी

प्रल्हाद कांबळे
Monday, 28 September 2020

उमरी तालुक्यातील तळेगाव येथील राहणारा नर्सिंग नागनाथ यंगलवार सचिन नरसिंग यंगलवार यांनी शंकर संजय काटकर रा. देगाव ता. नायगाव याच्या मदतीने तळेगाव येथील पंजाब नॅशनल बँक ता. १७ सप्टेंबरच्या रात्री फोडली.

नांदेड : उमरी तालुक्यातील तळेगाव येथील पंजाब नॅशनल बँक फोडण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्याने बाजारात असलेले किराणा दुकान फोडल्याची घटना घडली होती. या दोन्ही प्रकरणातील तिन चोरट्यांना उमरी पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ता. एक आॅक्टोबरपर्यंत (चार दिवसाची) पोलिस कोठडी सुनावली आहे. 

उमरी तालुक्यातील तळेगाव येथील राहणारा नर्सिंग नागनाथ यंगलवार सचिन नरसिंग यंगलवार यांनी शंकर संजय काटकर रा. देगाव ता. नायगाव याच्या मदतीने तळेगाव येथील पंजाब नॅशनल बँक ता. १७ सप्टेंबरच्या रात्री फोडली. मात्र त्यांना तिजोरी फोडता आली नसल्याने त्यांनी आपला मोर्चा उमरी बाजाराकडे वळविला. शहरातील एक किराणा दुकान फोडून एक लाख दहा हजाराचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणात अज्ञाताविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

हेही वाचा - नांदेडमध्ये दुर्दैवी घटना : पित्यापाठोपाठ कन्येने सोडले प्राण -

बँक व दुकानफोडीचे गुन्हे केल्याची कबुली 

उमरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी गुप्त माहितीवरून या दोन्ही प्रकरणाचा तपास आपल्याकडे घेतला. गुप्त माहितीवरुन बँक व किराणा दुकान फोडणाऱ्यांची माहिती काढली. रविवारी (ता. २७) पहाटे या तिन्ही चोरट्यांना त्यांनी उमरी शहरातून अटक केली. त्यांची कसुन चौकशी केली असता त्यांनी बँक व दुकान फोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली असता हाती काहीच लागले नाही. त्यांना रविवारी (ता. २७) दुपारी उमरी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने वरील तिघांनाही चार दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे. त्यांच्या फरार असलेल्या एका साथिदाराला लवकरच अटक करणार असल्याचे श्री. निकम यांनी सांगितले. 

कुत्र्याच्या हल्ल्यातून काळविटाला जीवदान

हिमायतनगर : तालुक्यातील सवना ( जं ) शिवारात एका नाल्यावरून काळविटाच्या कळपाने उडी मारून नाला पार केला. परंतु पाच वर्षे काळवीट चिखलात फसले. फसलेल्या काळविटाच्या पिल्लावर कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केला. ही बाब लक्षात येताच तेथील काही तरुणांनी या काळविला कुत्र्याच्या तावडीतून सोडविले.

येथे क्लिक करा - दुर्दैवी घटना : उमरी शिवारात मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू -

पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात येणार 

शेतकरी बालाजी पंजाबराव यांनी याबाबतची माहिती वनपाल श्री. बोर्लावाड यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितली. त्यांनी वनखात्याच्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. जखमी काळविटाला घेऊन हिमायतनगर येथे आणून पशुधन विकास अधिकारी डॉ. सोनटक्के यांच्याकडे आणले. डॉ. सोनटक्के यांनी जखमी काळविटावर उपचार केला. जखमी काळविट हा सध्या वनविभागाच्या ताब्यात असून त्याला पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात येणार असल्याचे श्री. बोर्लावाड यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Umri: Thieves remanded in police custody nanded news