नांदेडहून मुंबईसाठी आता दररोज विशेष रेल्वे

प्रमोद चौधरी
Saturday, 10 October 2020

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नांदेडहून दररोज सायंकाळी मुंबईसाठी विशेष रेल्वे सोमवारपासून सुरु करण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेने घेतला आहे.

नांदेड :   सहा महिन्यांपासून बंद असलेली रेल्वे सेवे पुन्हा टप्याटप्याने पूर्वपदावर येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारपासून (ता.१२) नांदेडहून मुंबईला जाण्यासाठी दररोज विशेष रेल्वे सोडली जाणार आहे. नियमित रेल्वे सेवा सुरुहोईपर्यंतच ही विशेष गाडी चालवली जाणार असल्याचे रेल्वे विभागाच्या वतीने कळविले आहे.

प्रवाशांची गैरसोय होवू नये म्हणून रेल्वेची बंद असलेली सुविधा हळूहळू सुरु होत आहे. सद्यस्थितीत फक्त आरक्षण केलेल्यांनाच रेल्वेमधून प्रवास करता येत आहे. नांदेडहून मुंबईला व मुंबईहून नांदेडला सुरु झालेल्या विशेष रेल्वेमध्ये फक्त आरक्षण (रिझर्व्हेशन) केलेल्या प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे. रविवारपासून (ता.११) गाडी क्रमांक ०११४१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून नांदेडसाठी सायंकाळी चार वाजून ३५ मिनिटांनी सोडण्यात येणार आहे. ही गाडी मनमाड, औरंगाबाद मार्गे पहाटे साडेपाच वाजता नांदेडला पोचेल. 

हेही वाचा - पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत घट, शुक्रवारी २२२ जण कोरोनामुक्त, १७० पॉझिटिव्ह

तसेच गाडी संख्या ०११४२ हुजूर साहेब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ही गाडी सोमवारपासून (ता.१२) नांदेड रेल्वे स्थानकावरून दररोज सायंकाळी पाच वाजता सुटून मुंबईला सकाळी साडेपाच वाजता पोहचेल. या दोन्ही गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, लासलगाव, मनमाड, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी आणि पूर्णा येथे थांबा असणार आहे. या विशेष गाडीला वातानुकूलित द्वितीय श्रेणी, वातानुकूलित तृतीय श्रेणी, द्वितीय श्रेणी आरक्षित आणि आरक्षित सीटिंग डब्ब्यांची सुविधा असेल. 

हे देखील वाचलेच पाहिजे - सार्वजनिक ग्रंथालय चालकांच्या अडचणीत वाढ

सूचनांचे पालन करणे आवश्यक

मार्च महिन्यापासून बंद असलेली रेल्वे सेवा आता हळूहळू सुरु होत असल्याने प्रवाशांना दिलासा मिळत आहे. नांदेडहून अमृतसरसाठी सचखंड एक्सप्रेस सुरु झाल्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात परभणीहून नांदेडमार्गे हैदराबादसाठी रेल्वे सुरु झाली आहे. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये नांदेडहून मुंबईसाठी दररोज विशेष रेल्वे सोमवारपासून सुरु करण्यात येत आहे. प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करतांना भारत सरकार आणि राज्य सरकार यांनी कोविड -१९ संसर्गासंदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special Daily Train Service From Nanded To Mumbai Nanded News