नांदेड जिह्यात फवारणीचा काळ अन जनजागृतीचा दुष्काळ

File photo
File photo

नांदेड : खरिपाच्या सुरुवातीपासूनच पावसाने हजेरी लावल्यामुळे पीके चांगलीच बहरली आहे. परंतु, सततच्या पावसामुळे हाताशी आलेली पिके जात असून, शेतकरी चिंतातूर झाला आहे. तसेच ज्या पिकांची वाढ होत आहे त्यावर किडी रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे आता कीटकनाशकांच्या फवारणीवर शेतकऱ्यांचा जोर आहे. 

गेल्या तीन ते चार वर्षात ऋतुचक्रात परिणामी हवामानात वेळोवेळी आमुलाग्र बदल होत आहे. त्यामुळे सर्वच पिकांवर कीडी, रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नातून तीव्र क्षमतेचे कीटकनाशक, तणनाशक शेतकऱ्यांनी वापरायला सुरु केले आहे. मात्र, या रसायनांची फवारणी करताना, विषबाधा होऊन शेकडो शेतकऱ्यांचे आजवर बळी गेलेले आहेत. त्यावर उपाय म्हणून, विविध कीटकनाशकांवर बंदी लादण्यात आली. तसेच विषबाधा टाळण्यासाठी सर्व स्तरावरून सुरक्षित फवारणी आणि कीटकनाशकांची हाताळणी याबाबत जनजागृती करण्याचे कार्य यंदा मात्र थंडबस्त्यात असल्याचे दिसून येते.

फवारणी करताना अशी घ्यावी काळजी
प्लास्टीक बकेटमध्ये पाणी घेऊन, त्यात कीटकनाशक मोजून टाकावे. ढवळून एकजीव द्रावण तयार करावे. प्रत्येकवेळी पंपामध्ये द्रावण भरताना ते ढवळून घ्यावे. कीटकनाशक वापरण्यापूर्वी लेबल व माहिती पत्रक वाचून सूचना पाळाव्यात. तणनाशके फवारणीचा पंप, कीटकनाशके फवारणीसाठी वापरू नये. फवारणी करताना संरक्षक कपडे, बुट, हातमोजे, नाकावरील मास्क वापरावे. उघड्या अंगाने फवारणी टाळावी. फवारणी करताना धुम्रपान, तंबाखूचे सेवन करू नये. फवारणी झाल्यानंतर हात साबणाने स्वच्छ करूनच भोजन करावे. विषबाधा झाल्यास, कीटकनाशकाचे माहितीपत्रकासह डाॅक्टरांकडे जावे.

किटकनाशकांची खरेदी करताना घ्यावयाची काळजी

  • कीटकनाशके खरेदीपूर्वी पिकांवर कोणती कीड, रोग आहे याची सर्वेक्षणाद्वारे खातरजमा करावी.
  • तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आवश्यक कीडनाशकांची खरेदीसाठी निवड करावी.
  • साठवणुकीमध्ये असलेली कीटकनाशके, पिकाची अवस्था, झालेली वाढ, क्षेत्र, विचारात घेऊन नेमकी तेवढीच कीटकनाशकांची मात्रा खरेदी करावी.
  • शिफारस केलेली कीटकनाशके नामांकित कंपनीची अधिकृत पावती घ्यावी.
  • कीटकनाशक तयार केल्याची तारीख तसेच अंतिम मुदत तपासावी.
  • किरकोळ स्वरूपात खरेदी न करता संपूर्ण बाटली किंवा डबा खरेदी करावा.
  • कीटकनाशके खरेदी केल्यानंतर ती खाद्य पदार्थांसोबत एकत्र ठेऊ नये.
  • कीटकनाशके कुलुपबंद पेटीत ठेवावे. लहान मुलांपासून दूर ठेवावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com