
नांदेड विभागातील एसटी बसच्या संख्येत दुपटीने वाढ
नांदेड : संपावर असलेले अनेक एसटी कर्मचारी अजूनही पूर्णपणे कामावर परतले नाहीत. दुसरीकडे शासनाच्या वतीने एसटी महामंडळात चालक - वाहकाची भर्ती करुन एसटी बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या जात आहेत. आठवड्याभरापूर्वी नांदेड एसटी विभागातुन धावणाऱ्या एसटी बसेसची संख्या ३० इतकी होती. त्यात दुपट्टीने वाढली आहे. त्यामुळे दुत्पन्न देखील चार ते सहा लाखाच्या घरात जाऊन पोहचले आहे.
मागील आठवड्यात ता.एक मार्चला नांदेड बस डेपोतून २६ नियत चालविण्यात आले. त्या बसेसने सात हजार ८०२.२ किलोमीटर पार करत दोन लाख ६९ हजार ३३० रुपयाचे उत्पन्न मिळविले होते. या दरम्यान तीन हजार ९५८ प्रवाशांनी एसटीने प्रवास केला होता. त्याच्या एक आठवड्यानंतर शनिवारी (ता.पाच) आणि रविवारी (ता.सहा) आशा दोन दिवसात नांदेड विभागातून ५६ बसेस धावल्या. यात एकट्या नांदेड आगारातून अनुक्रमे २८ आणि दहा नियत चालविण्यात आले. या दोन दिवस मिळून एकट्या नांदेड आगारास चार लाख ७४ हजार ९५ रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे.
हळूहळू नांदेड एसटी विभागाच्या उत्पन्नात भर पडत असून, दुसरीकडे विभागातील दोन हजार ८०६ कर्मचाऱ्यांपैकी ३०६ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. अनेक वेळा कामावर परत येण्याच्या लेखी सुचना देऊनही कामावर परत न येणाऱ्या आत्तापर्यंत ३१८ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. तर नऊ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले या शिवाय दोन कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप काही केल्या मिटताना दिसत नाही. त्यामुळे अजून किती दिवस संपावर अडून बसावे लागणार असा सवाल एसटी महामंडळातील संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांकडून सहकाऱ्यांना विचारला जात आहे. परंतु त्यांचा आवाज दाबण्याचा सहकाऱ्यांकडून प्रयत्न होत आहे. त्यामुळे संपात सहभागी होण्याची इच्छा नसताना देखील संपकरी कर्मचाऱ्यांसोबत राहावे लागत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे.
Web Title: St Strike Nanded Division St Buses Update
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..