‘या’ आगारातून निर्जंतुकीकरणाविनाच धावतात एसटी

images_.jpg
images_.jpg

कंधार, (जि. नांदेड) ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एसटीसाठी राज्य सरकारने काही गाइडलाइन आखून दिल्या आहेत. यात स्वच्छता, बसचे निर्जंतुकीकरण, कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करून देणे, सोशल डिस्टन्सिंग आदी बाबींचा समावेश आहे; परंतु कंधार आगारातील एसटी गाइडलाइनला हरताळ फासून प्रवाशांची ये-जा करीत आहे. बसचे निर्जंतुकीकरण केले जात नाही. स्वच्छतेचाही बोजवारा उडाला आहे. प्रवाशांसह चालक-वाहकांच्या जिवाशी खेळ करीत कोरोनाला निमंत्रण मिळत असल्याचे चित्र आहे. 


सोशल डिस्टन्सिंगचे पालन करतात का?
कंधार तालुक्यात कोरोनाने पकड घट्ट केली आहे. सव्वातीनशेच्या जवळ बाधितांचा आकडा पोचला आहे. २० बाधित रुग्णांचा आतापर्यंत जीव गेला आहे. बाधितांची संख्या कमी होण्याऐवजी वरचेवर वाढतच आहे. यामुळे शहर व परिसरात भीतीचे वातावरण आहे. अशा वेळी बंद पडलेली एसटीची चाके २० ऑगस्टपासून पुन्हा फिरू लागली. शर्ती आणि अटीच्या अधीन राहून राज्य सरकारने सहा महिन्यांनंतर आंतरजिल्हा सेवेला हिरवा कंदील दाखवला. कोरोनाच्या पार्शवभूमीवर गाइडलाइनचे पालन होणे गरजेचे असताना सर्व नियम धाब्यावर बसवून कंधार आगारातील एसटी धावत आहेत. प्रवासी मास्क लावतात का? सोशल डिस्टन्सिंगचे पालन करतात का? याकडे कटाक्षाने पाहिले जात नाही.


बाहेर जिल्ह्यातील हजारो प्रवाशांची ये-जा
एसटी सुरू झाल्याने प्रवाशांचीही ये-जा सुरू झाली. ग्रामीण भागासह नांदेड, नागपूर, आळंदी आदी शहरात एसटी सेवा सुरू करण्यात आली असली तरी गाइडलाइनकडे मात्र दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. प्रशासनाला एसटीच्या निर्जंतुकीकरण, धुणे, कर्मचाऱ्यांच्या सॅनिटायझरकडे पाहण्यास वेळ नाही. प्रवाशांनी मास्क लावला का, सोशल डिस्टन्सिंगचे पालन होते की नाही याकडेही लक्ष दिले जात नाही. नियम डावलून बसमध्ये प्रवासी भरले जातात. कोरोनाचा फैलाव जोरात सुरू असताना एसटी मात्र नियमांचे उल्लंघन करत असून एसटी प्रशासनाचे हे वागणे कोरोनाच्या पथ्यावर पडत आहे. यामुळे नियमांचे पालन करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अडचण होत आहे. एसटीने आंतरजिल्हा सेवा सुरू केल्याने कंधार-लोहा तालुक्यात बाहेर जिल्ह्यातील हजारो प्रवाशांची ये-जा सुरू झाली आहे. 

गाइडलाइनकडे दुर्लक्ष
कोण कोठून येतो, कोण कसा आहे याची माहिती नसते. अशा वेळी वेळोवेळी एसटी धुणे, निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे; पण प्रशासन याकडे दुर्लक्ष करते आहे. ही बाब प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक असून यातून कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता आहे. गाइडलाइनकडे दुर्लक्ष झाल्याने आगारातील एक पुरुष वाहक, एक महिला वाहक आणि एका पुरुष चालकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. बस धुणे, निर्जंतुकीकरण करणे, चालक व वाहकाना सॅनिटायझर उपलब्ध न करणे, स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग, मास्क याकडे असेच दुर्लक्ष होत राहिल्यास प्रवाशांबरोबर चालक व वाहकसुद्धा कोरोनाच्या तावडीतून सुटणार नाहीत, हे मात्र खरे. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com