उपचारासाठी अशीही धडपड, चार शासकीय रुग्णालयात सहाशे खाटा राखीव; तरीही खासगीकडेच धाव? 

शिवचरण वावळे
Tuesday, 13 October 2020

सुरुवातीच्या काळात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना शासकीय रुग्णालयाशिवाय पर्याय नव्हता. परंतु कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत भर पडल्याने शासनाने खासगी रुग्णालयास देखील नियमावली ठरवून देत खासगी कोविड सेंटरला उभारण्यासाठी परवानगी दिली. बघता बघता अनेक मोठ्या खासगी रुग्णालयाने कोरोना कोविड सेंटर सुरु केले. 

नांदेड - विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात २८०, वजिराबादच्या श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नव्या आणि जुन्या इमारतीमध्ये मिळून तीनशे, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयात ५० खाटा कोरोना बाधित रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक पॉझिटिव्ह रुग्णांची ऐपत नसताना शासकीय ऐवजी खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याची धडपड सुरु आहे. 

शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधेबद्दल विनाकारण प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येते. सुरुवातीच्या काळात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना शासकीय रुग्णालयाशिवाय पर्याय नव्हता. परंतु कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत भर पडल्याने शासनाने खासगी रुग्णालयास देखील नियमावली ठरवून देत खासगी कोविड सेंटरला उभारण्यासाठी परवानगी दिली. बघता बघता अनेक मोठ्या खासगी रुग्णालयाने कोरोना कोविड सेंटर सुरु केले. 

हेही वाचा- नांदेड : रानडुकराच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, तर अन्य घटनेत दोघांचा मृत्यू ​

खासगी कोविड सेंटरमध्ये चांगल्या सुविधा दिल्या जात असल्या, तरी सामान्य माणसाला या रुग्णालयाचा सुविधा परवडणाऱ्या नाहीत. त्यासाठी दिवसाला हजारो रुपये मोजावे लागतात. त्या मानाने शासकीय रुग्णालयात एक रुपया खर्च न करता कोरोना आजारावर दहा दिवसाच्या उपचाराने सहज मात करता येते. मात्र, कोरोनाला घाबरलेले अनेक रुग्ण मृत्यूच्या भीतीने ऐपत नसताना देखील खासगी कोविड सेंटरमध्ये दाखल होत आहेत. परंतु औषधोपचाराचे व रुग्णालयाने दिलेल्या बिलाचा आकडा बघुन चक्रावून जात आहेत. 

हेही वाचले पाहिजे- तीन अनाथांचा ‘एक नाथ’ शोधण्यासाठी संघर्ष सुरू ​

जिल्ह्यातील तिन्ही शासकीय रुग्णालयात मिळून कोरोना रुग्णांसाठी ६३० खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सध्या विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात १३७, जिल्हा रुग्णालयात ६६, जिल्हा रुग्णालय (नवी इमारत) ३६, आयुर्वेदिक शासकीय रुग्णालय सेंटरला आठ असे २४७ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. तर एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन व होम आयसोलेशन एकत्रित एक हजार ५०२ असे उपचार घेत आहेत. खासगी रुग्णालय कोविड सेंटर मध्ये २३१ रुग्ण उपचार घेत आहेत. तीन शासकीय रुग्णालये, पंजाब भवन, यात्रीनिवास महसूल भवन व होमक्वॉरंटाईनमध्ये मिळुन ७४९ रुग्ण उपचार घेत आहेत. रविवारी (ता. ११) संध्याकाळपर्यंत विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात ७२, आयुर्वेदिक शासकीय रुग्णालयात ५१, जिल्हा रुग्णालयात ६५ असे मिळुन १८८ बेड शिल्लक असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या खाटांचा गुंता अजूनही उलगडला नाही. शासकीय रुग्णालयातील खाटांची संख्या अधिक असताना पॉझिटिव्ह रुग्ण खासगी कोविड सेंटरमध्ये का? दाखल होत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Such a struggle for treatment Six hundred beds reserved in four government hospitals Still run private Nanded News