नामांतराचा संघर्ष जिंकला, राजकीय संघर्षाचे काय? ज्येष्ठ नेते सुरेश गायकवाड यांचा सवाल

file photo
file photo

नांदेड : औरंगाबाद विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी उभारलेला संघर्ष आंबेडकरी चळवळीने जिंकला, मात्र आंबेडकरी चळवळीला अद्यापही राजकीय संघर्ष जिंकता आला नाही त्याचे काय ? असा सवाल आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा प्रजासत्ताक पक्षाचे अध्यक्ष सुरेशदादा गायकवाड यांनी उपस्थित केले आहे.

नामांतरदिनानिमित्त शहिदांना अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. औरंगाबाद विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी 16 वर्षे चाललेल्या संघर्षाला 1994 मध्ये यश मिळाले. नामांतर लढ्यात नांदेड जिल्ह्यातील पोचीराम कांबळे, जनार्दन मवाडे, गौतम वाघमारे हे शहीद झाले. नामांतर लढ्यात शहीद झालेल्या भीमविरांना अभिवादन करण्यासाठी शुक्रवारी (ता. 14) जानेवारी रोजी महात्मा फुले पुतळ्यासमोर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यांची होती उपस्थिती

यावेळी प्रा. देवीदास मनोहरे, पी. एस. गवळे, जे. डी. कवडे, बबीताताई पोटफोडे, नंदकुमार बनसोड, रवी गायकवाड, राजेश रापते, विजय गोडबोले, ऍड. मधुकर टेळकीकर, ऍड. बादलगावकर, शिलरत्न चावरे, भगवान गायकवाड, बालाजी मोरे, दत्ताहरी धोत्रे, विकास इंगोले, कपिल वाबळे, प्रबुद्ध चित्ते, गब्बर सोनवणे, धम्मानंद गजभारे, व्यंकट इंगोले यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

आपले अस्तित्व टिकविण्यासाठी समाज एकत्र येत नाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर शहिदांना अभिवादन करण्यापूर्वी महात्मा फुले आणि सावित्रीआई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पअर्पण करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात पुढे बोलताना सुरेश गायकवाड म्हणाले, आंबेडकरी चळवळीने नामांतराचा लढा अत्यंत प्रखरपणे लढला. अन्याय, अत्याचाराविरुद्ध बंड करुन उठलेली चळवळीने हा लढा जिंकली खरा, मात्र आंबेडकरी चळवळीला राजकीय संघर्ष आजपर्यंत स्वतंत्रपणे जिंकता आला नाही. आजही शैक्षणिक, सामाजिक, असंख्य प्रश्न आहेत. शैक्षणिक, सामाजिक, गायरान अशा विविध प्रश्नांवर आंबेडकरी आंदोलने उभारताना समाज एकत्र येतो, मात्र राजकारणात आपले अस्तित्व टिकविण्यासाठी समाज एकत्र येत नाही, त्यामुळे आजचा युवक सैरभैर झाला आहे. 

कोणत्याही पक्षात कार्यकर्त्यांची दुसरी सक्षम फळी तयार होऊ दिली नाही

ज्यांच्याकडे राजकीय नेतृत्त्व आहे, त्यांचा पक्ष हा मालकी पक्ष झाला आहे. सत्ता व्यक्तीकेंद्रीत झाल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना कुणीही अमलात आणत नाहीत. कोणत्याही पक्षात कार्यकर्त्यांची दुसरी सक्षम फळी तयार होऊ दिली नाही, त्यामुळे कौटुंबिक वारशाशिवाय चळवळीतील राजकीय पक्षांना अन्य नेतृत्त्व मिळाले नाही. परिणामी सैरभैर झालेला युवक शत्रूपक्षाच्या मृत्यू सापळ्यात अडकतो आहे आणि ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे आता गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असेही सुरेश गायकवाड म्हणाले. दरम्यान शहीद पोचीराम कांबळे यांची सून जयश्री बाबू कांबळे आणि शहीद चंदर कांबळे यांची कन्या मीनाताई हिचा यावेळी सुरेश गायकवाड यांच्यावतीने सन्मान करण्यात आला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com