सुवर्ण प्राशन संस्कार, आयुर्वेदीक टॉनिक- डॉ. गंगाधर घुटे

file photo
file photo

नांदेड : लहान मुले ही मातीच्या गोळ्यासारखी असतात. त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या संस्करावरच त्यांचे भवितव्य अवलंबून असते. बालकांच्या मानसिक, शारीरिक व बौद्धिक विकासासाठी बाजारात आजकाल अनेक औषधी उपलब्ध आहेत. परंतु प्राचीन काळापासून आयुर्वेदामध्ये सुवर्ण प्राशन संस्कार करण्याचा सल्ला दिला आहे. कारण सुवर्ण प्राशनमुळे बालकांची मानसिक, शारीरिक, बौद्धिक वाढ उत्तम प्रकारे होते व स्मरणशक्तीमध्ये वाढ होते. एकूणच या स्पर्धेच्या युगात सुवर्ण प्राशन संस्कार झालेला बालक अव्वल ठरतो. थोडक्यात सांगायचे झाल्यास सुवर्ण प्राशन हे बलवर्धक, बुद्धिवर्धक व रोगप्रतिकारक असे आयुर्वेदिक टॉनिक असल्याचे आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. गंगाधर घुटे यांनी सांगितले. 
 
सुवर्ण प्राशन संस्कार हा आयुर्वेदातील १६ संस्कारापैकी एक महत्त्वाचा संस्कार असून हा संस्कार शुन्य ते १३ वर्षे वयोगटातील बालकांना करण्यात येतो. सुवर्ण प्राशन म्हणजे सुवर्ण भस्म, मध, वाचा, गाईचे तूप इत्यादीपासून पुष्य नक्षत्रास बनविलेले गुणकारी आयुर्वेदिक औषध असून, सुवर्ण प्राशन बालकांना देण्याच्या प्रक्रियेला सुवर्ण प्राशन संस्कार असे म्हणतात.

कश्यप संहितेमध्ये महर्षी कश्यप यांनी वर्णन केले

‘ सुवर्णप्राशन ही एतत मेधाग्निबलवर्धनम्। 
आयुष्यं मंगलम पुण्यं वृष्यं ग्रहापहम्।।
मासात् परममेधावी क्याधिर्भिनर च धृष्यते। 
षड्भिर्मासै: श्रुतधर: सुवर्णप्राशनाद भवेत्।। ’ 

वरील श्‍लोकाचा (संहितेचा) अर्थ 

अर्थात सुवर्ण प्राशन मेधवृद्धीकार- बुध्दी वाढविणारे, अग्निवृद्धीकर-भूक वाढविणारे, बलवृद्धीकर- शक्तीदायक, आयुवृद्धीकर-दीर्घ आयुष्य देणारे, कल्याणकारी- सर्वांगीण विकास करणारे, पुण्यकारक- रोगप्रतिकारक क्षमता वाढविणारे, वृषयकर- शरीरातील सप्तधातूंची वृद्धी करणारे, वरण्यकर- सौंदर्यवृद्धी करणारे, गृहबाधानाशक- बाह्यसंक्रमनापासून रक्षण करणारे तसेच सहा महिन्यापर्यंत सुवर्ण प्राशन केल्यास बालक श्रुतधर अर्थात एकदा ऐकलेले लक्षात ठेवणारा होतो. अशाप्रकारे सुवर्ण प्राशन केल्यामुळे बालकाची मानसिक, शारीरिक व बौद्धिक वाढ होते असे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे.

पुष्य अर्थात पोषण करणारे नक्षत्र 

सुवर्ण प्राशन संस्कार हे पुष्य नक्षत्रास करणे हितकारक असते. व सुवर्ण प्राशन औषधी पुष्य नक्षत्राच्या दिवशीच बनविली जाते. कारण या दिवशी या औषधीवर पुष्य नक्षत्राचा विशेष प्रभाव असतो. तसेच पुष्य अर्थात पोषण करणारे नक्षत्र असल्यामुळे सुवर्ण प्राशन पुष्य नक्षत्रास करणे अधिक हितकारक आहे. गुरुपुष्यमृत असलेल्या दिवशी सुवर्ण प्राशन करणे अमृततुल्य असल्याचे वर्णन आयुर्वेदिक शास्त्रामध्ये करण्यात आले आहे. सुवर्ण प्राशन संस्कार शुन्य ते १३ वयोगटातील बालकांना आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करणे योग्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com