तिळगुळ घ्या गोडगोड बोला : मकरसंक्रांतीच्या भोगीसाठी बाजारपेठ फुलली 

प्रल्हाद कांबळे
Saturday, 9 January 2021

तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला या गोड शुभेच्छा देणाऱ्या मकर संक्रांतीच्या तयारीसाठी नांदेडची बाजारपेठ फुलली आहे.

नांदेड : नात्यात, मित्र आणि सग्या- सोयऱ्यात प्रेम दुप्पट व्हावे व एकमेकांशी आदराने व प्रेमाने राहता यावे यासाठी वर्षातून एकदा मकर संक्रांत हा सण वर्षाच्या सुरवातीलाच म्हणजे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात येतो. या सणाला तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला या गोड शुभेच्छा देणाऱ्या मकर संक्रांतीच्या तयारीसाठी नांदेडची बाजारपेठ फुलली आहे. शहर आणि परिसरातील बाजारात भोगी आणि संक्रातीसाठी लागणाऱ्या वस्तू दाखल झाल्या आहेत.

सुगडी, साखरेचा हलवा, तिळगुळाचे लाडू, अनेक रंगीबेरंगी कपडे कपडे, दान देण्यासाठी लागणाऱ्या साहित्य, आणि पतंग या वस्तु बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. संक्रात ही येणाऱ्या पाच ते सहा दिवसावर येऊन ठेपली आहे. मात्र सणालाही कोरोनाचे ग्रहण लागले आहे. कोरोनामुळे सर्वच वस्तु महागल्या आहेत. किमतीमध्ये यावर्षी आठ ते दहा टक्‍क्‍यांनी वाढ दिसून येत आहे. सुगडीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरामध्ये या वर्षी वाढ झालेली दिसते. 

हेही वाचाकाय म्हणता ? शहरालगत गोदावरीचे 30 टक्के पाणी प्रदूषित

शहराच्या वजीराबाद मार्केटमधील किंमत दहा ते बारा रुपये होती. बोरांच्या किमतीमध्ये गेल्यावर्षीपेक्षा वाढ झालेली आहे. संक्रातीमध्ये हलव्याच्या दागिन्यांचे वैशिष्ट्यपूर्ण प्रकार यंदा पाहायला मिळत आहेत. वानाचे विविध प्रकार बाजारात आले आहेत मात्र त्यांच्या किमती गगणाला भिडल्या आहे. यावर्षी स्त्रियांप्रमाणे पुरुषांच्याही दागिन्यांमध्ये विविधता आहे. पारंपारिक हार, कानातले फुल, बाजूबंद, गळ्यातील हार, बांगड्या, पाटल्या, तोडे यामध्ये वेगळेपण दिसून येते. लहान मुलांच्या दागिन्यामध्ये बासरी, मुकुट यासह हातातली वाळी, कडे, गळ्यातले हारही उपलब्ध आहेत. या वर्षी हलव्याच्या दागिन्यांच्या किमतीमध्ये ही वाढ झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sweet talk: The market for Makar Sankranti has flourished nanded festival news