नांदेडला पुरात तिघे जण वाहून गेले,विष्णुपुरीचे तीन दरवाजे उघडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड : विष्णुपुरी प्रकल्पाचे तीन दरवाजे सोमवारी दुपारी उघडण्यात आले असून त्यातून नदीपात्रात विसर्ग करण्यात येत असल्याने गोदावरी नदी दुधडी भरून वाहत आहे.

नांदेडला पुरात तिघे जण वाहून गेले,विष्णुपुरीचे तीन दरवाजे उघडले

नांदेड : जिल्ह्यात सोमवारी (ता.३०) दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे दोन तालुक्यासह सहा मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हा पाऊस इतर भागातील चांगला झाला. या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या पावसामुळे आलेल्या पुरात तीन जण वाहून गेले आहेत. त्याचबरोबर विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याचा येवा वाढल्याने मंगळवारी (ता.३१) दुपारी तीन वाजेपर्यंत तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून एक हजार ४०१ क्युसेक्स विसर्ग गोदावरी नदीपात्रात करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे.जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊसही झाला.

हेही वाचा: दोन तलाव फुटून हाहाकार, स्लॅब फोडून कुटुंबाला काढले बाहेर

दरम्यान, सोमवारी दुपारी चारनंतर जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस झाला. हा पाऊस लोहा, देगलूर, मुखेड, कंधार, हिमायतनगर, धर्माबाद, माहूर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाला. पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे जिल्ह्यातील सहा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या सोबत इतरही मंडळात चांगला पाऊस झाला. या पावसामुळे सोयाबीन पिकाला दिलासा मिळाला आहे. यासोबतच कपाशी, तूर, ज्वारी या पिकांनाही या पावसाचा फायदा झाला आहे.लोहा तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे या तालुक्‍यात सरासरी ६९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर देगलूर तालुक्यात सरासरी ६५.४० मिलिमीटर पाऊस झाला. तर माळाकोळी - १३७.५८, चांडोळा - १२७.३०, कुरुळा - ८२, मुखेड - ९७.८०, जांब - ६६.८९ या पाच महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.

तीन जण वाहून गेले

दरम्यान, उंद्री (पदे) (ता. मुखेड) येथील एक १५ वर्षाचा मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेला तर दुसरीकडे कोष्ठवाडी (ता. लोहा) येथील ३२ वर्षाचा व्यक्ती जनावरे चरायला घेऊन शेतात गेला होता. तो सोमवारी सायंकाळी घरी येत असताना पुरात वाहून गेला आहे. कंधार तालुक्यात तिसरा जण वाहून गेला आहे.

२४ तासांत झालेला तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा आहे;

नांदेड २०.२०, बिलोली ४२.६०, मुखेड ६२.२०, कंधार ५७.७०, लोहा ६९ हदगाव दहा १०.२०, भोकर २९.५०, देगलूर ६५.४०, किनवट १९.३० मुदखेड १४.१०, हिमायतनगर ३२.९०, माहूर २४, धर्माबाद ४७.५०, उमरी १४, अर्धापूर २१.७० तर नायगाव ३९.२०. सरासरी ३७.२० तर आजपर्यंत जिल्ह्यात ६४७ मिलिमीटर नुसार ८८.६६ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

loading image
go to top