esakal | फायरींग करून व्यापाऱ्याला लुटले, मात्र पोलिसांच्या जाळ्यात अडकले
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नायगाव तालुक्यातील बिलोली रस्त्यावर एका व्यापाऱ्याचा पाठलाग करून पिस्तुलमधून फायर केले. व्यापाऱ्याला जखमी करून त्याच्याकडून सव्वा सात लाखाची रोकड लुटली : दरोडेखोरांनी चाकुचा धाक दाखवला व गोळीबारही केला

फायरींग करून व्यापाऱ्याला लुटले, मात्र पोलिसांच्या जाळ्यात अडकले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नायगांव (जिल्हा नांदेड) : चाकुचा धाक दाखवून व व्यापाऱ्यावर पिस्तुलातून गोळीबार करुन दरोडेखोरांनी व्यापाऱ्याचे सव्वा सात लाख रुपये लुटल्याची घटना ( ता. एक) जुन रोजी सोमवारी रात्री नरसी पासून एक कि.मी. अंतरावर बिलोली रोडवर घडली. पण व्यापारी, नागरिक व पोलीसांच्या सहकार्याने तासभरातच तीन दरोडेखोरांना रामतीर्थ पोलिसांनी अटक केली. सदरची घटना समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर व अतिरिक्त पोलीस अधिक्षक दत्ताराम राठोड यांनी रात्रीच भेट देवून माहिती घेतली. 

कासराळी (ता. बिलोली) येथील व्यापारी संजय व्यंकटेश उपलंचवार यांचे मुखेड येथील एका व्यापाऱ्याकडे सात लाख २४ हजार रुपये येणे होते. त्यामुळे उपलंचवार यांचा मुनीम आनंदा हा ( ता. एक) जुन रोजी सोमवारी सायंकाळच्या दरम्यान मुखेड येथे गेला होता. तेथून रक्कम घेवून एका ओळखीच्या वाहनात बसून रात्री नरसी येथे आला. कासराळीला जाण्यासाठी वाहन नसल्याने त्याने मालक उपलंचवार यांना फोन लावला व मी नरसीला आलो असल्याची माहिती दिली. मालक येईपर्यंत मुनीम आनंदाने बसस्थानकात गेला होता. तेवढ्यात नांदेडहून मोटारसाकलवर आलेल्या तिघांची नजर आनंदावर पडली. हातात असलेली बॅग व त्यांच्या संशयास्पद हालचाली पाहता या तिघांनी त्यांच्यावर हल्ला करण्याच्या अगोदरच मालक उपलंचवार हे आनंदाला घेण्यासाठी मोटरसायकलवर नरसीला आले.

हेही वाचा Nanded Breaking ; सात वर्षीय मुलगी, चार वर्षाचा मुलगा पॉझिटिव्ह

सव्वासात लाखाची रोखड केली होती लंपास
 
मालक व मुनीम दोघे कासराळीकडे जात असतांना मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी पाठलाग सुरु केला. नरसीपासून एक कि. मी. अंतरावर लोहगावच्या वळणावर मोटारसायकल अडवली. मुनीमाच्या हातातील पैशाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मुनीम बॅग सोडत नसल्याने त्याला चाकूचा धाक दाखवण्यात आला. त्यामुळे मुनीम बॅग सोडून जिवाच्या आकांताने बाजूच्या शेतात पळाला. पण मालक उपलंचवार यांनी मात्र दरोडेखोरांचा निकराने सामना करत तिघांपैकी एका दरोडेखोराला जखडून ठेवले होते. त्यामुळे दुसऱ्या दरोडेखोरांने त्याच्या जवळ असलेल्या पिस्तुलातून व्यापारी अपलंचवार यांच्यावर गोळीबार केला. यात गोळी त्यांच्या कपाळाला चाटून गेली. यात ते जखमी झाले. त्यावेळी मात्र उपलंचवार यांनी भितीने घट्ट पकडलेल्या दरोडेखोराला सोडून दिले. पैशाची बॅग हस्तगत केल्यानंतर तिन्ही दरोडेखोरांनी त्यांची मोटारसायकल जाग्यावरच सोडून लोहगाव शिवारातील शेतात धुम ठोकली.

वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी

उपलंचवार यांनी घटनास्थळावरुन लोहगाव गाठले. तेथील काहींना घडलेली घटना सांगितली. त्यामुळे लोहगावच्या नागरिकांनी रामतीर्थ पोलीसांना संपर्क साधून घटना सांगितली व दरोडेखोर कोणत्या दिशेने गेले याचीही माहिती दिली. घटनेची माहिती समजताच रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे हे फौजफाट्यासह तत्काळ दरोडेखोरांच्या शोधत निघाले. नागरिक आणि पोलीसांच्या शोधमोहीमेत रात्री उशीरा तीन्ही दरोडेखोरांच्या नरसी शिवारात मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले. ज्या मोटारसायकलवरून तीन दरोडेखोर आले ती मोटारसायकल चोरीची असल्याचे समजले आहे. 

येथे क्लिक करा Video - लॉकडाउनमध्येही का वाढतोय सोन्या - चांदीचा भाव ?

रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
 
व्यापाऱ्याला अडवून चाकुचा धाक दाखवून व गोळीबार करत सव्वा सात लाखाची रोकड लुटल्याची  घटना समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक व अतिरिक्त पोलिस अधिक्षकांनी रात्रीच नरसी येथे व घटनास्थळी भेट देवून घटनेची माहिती घेतली. सदर प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.