esakal | संतापजनक घटना : शेतकऱ्यास आत्महत्येचा सल्ला देणाऱ्या मुजोर बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

दुष्काळाच्या व महागाईच्या विळख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी केंद्र व राज्य सरकार मोठा निधी उपलब्ध करुन देत आहे. मात्र तो निधी बॅंकेमार्फत शेतकऱ्यांना देण्यास टाळाटाळ केल्या जात आहे.

संतापजनक घटना : शेतकऱ्यास आत्महत्येचा सल्ला देणाऱ्या मुजोर बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

sakal_logo
By
बा. पू. गायखर

लोहा (जिल्हा नांदेड) : लोहा तालुक्यातील जामगा- शिवनी येथील शेतकऱ्याने नवीन पीक कर्ज मिळावे यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या लोहा शाखेकडे वारंवार मागणी केली. मात्र बँक व्यवस्थापक यांनी दाद दिली नाही. उलट त्या शेतकऱ्यास अंगावर राॅकेल टाकून आत्महत्या करण्याचा सल्ला दिला. या प्रकारानंतर शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.  संबंधीत बॅंक व्यवस्थापकावर अखेर लोहा पोलिस ठाण्यात रविवारी (ता. २०) अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दुष्काळाच्या व महागाईच्या विळख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी केंद्र व राज्य सरकार मोठा निधी उपलब्ध करुन देत आहे. मात्र तो निधी बॅंकेमार्फत शेतकऱ्यांना देण्यास टाळाटाळ केल्या जात आहे. पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने लोहा तालुक्यातील जामगा- शिवणी येथील शेतकऱ्यांने अमरण उपोषण करण्याची भूमिका बँक व्यवस्थापकासमोर केली. व्यवस्थापकाने उपोषण कशाला करता, अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करा, असा अजब सल्ला देऊन शेतकऱ्याला धक्के मारत बँकेच्या बाहेर काढले. हा संतापजनक प्रकार ता. १८ डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता घडला.

हेही वाचानांदेड : भावी कारभारी गाव कारभारात झाले मश्गुल, हॉटेल, बार, चहाटपरी आणि पारावर रंगत आहेत चर्चा -

या प्रकरणी शेतकऱ्याच्या फिर्यादीवरुन लोहा पोलिस ठाण्यात बँक व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामगा- शिवणी येथील शेतकरी बळीराम शेषराव बोमनाळे (वय ३७) हे शेती व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी दोन वर्षांपूर्वी शेतीवर महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या लोहा शाखेकडून पिक कर्ज घेतले होते. घेतलेल्या पीक कर्जाची त्यांनी ता. २८ जून २०२० रोजी परतफेडही केली. आता पुन्हा नवीन पीक कर्ज घेऊन शेती करावी म्हणून जुलैपासून बँकेकडे पीक कर्जाची मागणी केली. पण बँक व्यवस्थापकांनी नवीन कर्ज देण्यात चालढकल केली.

शेतकरी बळीराम बोमनाळे यांनी ता. १८ डिसेंबर रोजी पुन्हा बँकेत जाऊन कर्ज देण्याची विनंती केली असता व्यवस्थापक त्यांचे काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बँक व्यवस्थापकाच्या विरोधात उपोषण करण्याचा इशारा दिला असता बँक व्यवस्थापकांनी बाहेर काढून शिविगाळ केली. यावेळी सतीष गवते आणि सिद्धेश्वर भालके हे उपस्थित होते. या प्रकरणी शेतकरी बळीराम बोमनाळे यांनी लोहा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संपादन-  प्रल्हाद कांबळे