खळबळजनक :  साधूसह शिष्याच्या हत्येने नांदेड हादरलं

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 May 2020

नागठाणा येथे पालघर येथील घटनेची पुनरावृत्ती रविवारी (ता.२४ मे) पहाटे दीड ते दोन वाजेच्या घडली. मठातील एका शिष्यासह महाराजांची हत्या करून कपाटातील रोख रक्कम, सोने, चांदी आदी ऐवज आरोपीने लंपास केला.

नांदेड : नागठाणा बु.(ता. उमरी) येथील बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांची मध्यरात्री दीड वाजताच्या दरम्यान हत्या करण्यात आली. या घटनेने भाविकांमध्ये खळबळ उडाली असून, आरोपीला ताब्यात घेत नाही तोपर्यंत महाराजांचा मृतदेह न स्वीकारण्याची भूमिका भाविकांनी घेतली आहे. 

नागठाणा येथे राज्य मठाधिपती बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराज रहात होते. या मठामध्ये शिष्यगणही मोठ्या प्रमाणावर राहतात. कोरोनामुळे संपूर्ण जग संकटात आहे. त्यामुळे प्रत्येकजणच स्वतःची काळजी घेत घरामध्येच रहात आहे. या संधीचा फायदा घेत अनेक खून, दरोड्याच्या घटना घडत आहेत. नागठाणा येथेही पालघर येथील घटनेची पुनरावृत्ती रविवारी (ता.२४ मे) पहाटे दीड ते दोन वाजेच्या घडली. मठातील एका शिष्यासह महाराजांची हत्या करून कपाटातील रोख रक्कम, सोने, चांदी आदी ऐवज आरोपीने लंपास केला.

हेही वाचा -    या’ कारणामुळे आईने फेकले बाळाला कंन्टेनरखाली...

हद्द म्हणजे हा संशयीत आरोपी गावातीलच असल्याचे गावकरी सांगत आहेत. महाराजांची हत्या करून त्यांच्याच गाडीमध्ये महाराजांचा मृतदेह टाकून आरोपी गाडी पळवून नेण्याच्या बेतात होता. मात्र, शेजारील नागरिक तसेच मठाच्या गच्चीवर झोपलेले शिष्यगण जागे झाल्याने आरोपीने गाडी सोडून पळ काढला. परिणामी, नागरिकांना गाडीमध्ये महाराजांचा मृतदेह दिसल्याने एकच खळबळ उडाली. मठाची पाहणी करत असतानाच जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात एका शिष्याचाही मृतदेह दिसून आल्याने नागरिकांमध्ये अधिकच खळबळ उडाली. सध्या महाराजांचा मृतदेह उमरीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये ठेवण्यात आला आहे.  

हे देखील वाचाच - दोन योद्ध्यांना गाठले कोरोनाने, आरोग्य विभागात खळबळ...
 

शिष्याचाही खून
ज्या मठात शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून करण्यात आला, त्याच मठा शेजारील जिल्हा परिषद हायस्कूलच्या बाथरूममध्ये आणखी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. भगवान शिंदे (रा. चिंचाळा ता. उमरी) असे मयताचे नाव असल्याचे सांगण्यात येते. घटनास्थळी उमरी पोलिस रवाना झाले असून याबाबत अधिक तपास सुरू आहे. पालघरमध्ये दोन साधूंची जमावाकडून हत्या झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यात माथेफिरूकडून बाल तपस्वींची हत्या झाल्याने जिल्ह्यात एकचत् खळबळ उडाली आहे.

असे घडले हत्याकांड  
मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास नागठाणा येथे हत्याकांड झाले. सर्वप्रथम आरोपीने शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांच्या शिष्याची हत्या केली. त्यानंतर मठाच्या भिंतीवरून उडी मारून आरोपीने मठात प्रवेश केला. सर्व शिष्यगण मठाच्या गच्चीवर झोपलेले होते. महाराज एकटेच मठाच्या खोलीत झोपले होते. आरोपीने दार तोडून प्रवेश केला आणि महाराजाची तीक्ष्ण हत्याराने (कुऱ्हाड) हत्या केली. त्यानंतर कपाटातील ऐवज घेऊन आरोपीने महाराजांचा मृतदेह महाराजांच्या गाडीमध्ये ठेवला. मात्र, गाडी काढत असताना मठाच्या गेटमध्ये गाडी अडकली. त्या आवाजाने गावकरी, शिष्यगण जागे झाले. दरम्यान ऐवज खिशात टाकून आरोपी तेथून फरार झाला.

आरोपीला अटक केल्याशिवाय मृतदेह घेणार नाही
पालघरची पुनरावृत्ती नागठाणा बु. येथे घडली असून, नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. या घटनेतील आरोपी हा गावातीलच असून तो गुन्हेगारप्रवृत्तीचा आहे. यापूर्वीही त्याने गावातील एकाचा खून केला आहे. परंतु, त्यावेळी पोलिसांनी गांभीर्य घेतले नसल्यामुळेच ही घटना घडली आहे. त्यामुळे आरोपीला जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत महाराजांचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका गावकरी तसेच भाविकांनी घेतली आहे.
- शिवाजी पंचलिंगे, सरपंच (नागठाणा बु.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Sadhus Murdered in Nanded Nanded News