
दुचाकी व मोबाईल चोराला तेहरानगर परिसरातून सोमवारी (ता. २०) रात्री अटक केली. त्याच्याकडून दोन दुचाकी व एक मोबाईल जप्त केला.
नांदेड : शहराच्या वाजेगाव परिसरातून चोरलेली दुचाकी व मोबाईल चोराला तेहरानगर परिसरातून सोमवारी (ता. २०) रात्री अटक केली. त्याच्याकडून दोन दुचाकी व एक मोबाईल जप्त केला. चोरट्याला नांदेड ग्रामिण पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
शहरातील व जिल्ह्यातील फरार व पाहिजे असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी आपल्या संबंधित यंत्रणेला आदेशित केले. शहरातील विविध गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींना शोधण्यासाठी त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना सूचना दिल्या. या सूचनांची अंमलबजावणी करत श्री चिखलीकर यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना सतर्क केले. सोमवारी (ता. २०) सायंकाळच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती यांचे पथक शहरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना दुचाकी चोराबद्दल माहिती मिळाली. त्यांनी रात्री सापळा लावून तेहरानगर परिसरातून पोलिसांच्या रेकॉर्डवरील अटल दुचाकी चोरटा शुभम उर्फ शिवा दवणे याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने वाजेगाव परिसरातून पॅशन प्रो कंपनीची (एमएच २६-७६८४) दुचाकी व एक चार्जिंगला लावलेला सॅमसंग कंपनीचा मोबाइल चोरल्याची कबुली दिली.
हेही वाचा - नांदेडचे रस्ते झाले असुरक्षीत, लुटमारीच्या घटना वाढल्या
दुचाकी चोरट्याला पोलिस कोठडी
पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून पुन्हा एक विना नंबरची स्प्लेंडर प्लस कंपनीची दुचाकी जप्त केली. तो सांगवी येथील बाबू गायकवाड यांच्या मदतीने शहर व जिल्ह्यात दुचाकी आणि मोबाईल चोरीचे गुन्हे करत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती यांनी या चोरट्याची कसून चौकशी केली मात्र बाबू गायकवाड हा त्यांच्या हाती लागला नाही. शुभम दवणे याला दोन दुचाकी व मोबाईलसह नांदेड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. शुभम दवणे याला मंगळवारी (ता. २१) नांदेड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायलायाने त्याला पोलिस कोठडीत पाठविले आहे. या चोरट्याकडून अजून काही दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता श्री भारती यांनी वर्तविली आहे.
पथकात यांचा आहे सहभाग
या पथकात पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग भारती, सहाय्यक फौजदार जसवंतसिंह शाहू, शेख अब्दुल, हवालदार मारुती तेलंग, मोतीराम पवार, राजू पुलेवाड, शेख कलीम, दशरथ जांभळीकर आणि तानाजी येळगे यांनी परिश्रम घेतले. पथकाचे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षकविजय पवार आणि दत्ताराम राठोड यांनी कौतुक केले.