नांदेडात पुन्हा दोन पिस्तुलधारी युवकांना अटक - पोलिस निरीक्षक सुनिल निकाळजे

प्रल्हाद कांबळे
Thursday, 6 August 2020

दोन पिस्तुलधारी युवकांना मुदखेड पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मुगट (ता मुदखेड) येथील मातासाहेब देवाजी (बुढ्ढा दल) गुरुद्वारा येथे बुधवारी (ता. पाच) सायंकाळी केली. 

नांदेड : शहरात तीन दिवसांपूर्वीच गोळीबार करुन विक्की चव्हाण या गुंडाला ठार केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा दोन पिस्तुलधारी युवकांना मुदखेड पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मुगट (ता मुदखेड) येथील मातासाहेब देवाजी (बुढ्ढा दल) गुरुद्वारा येथे बुधवारी (ता. पाच) सायंकाळी केली. 

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मुगट (ता. मुदखेड ) येथे माता साहेब देवाजी (बुढ्ढा दल) नावाचा गुरुद्वारा आहे. या गुरुद्वारा परिसरात कुठला तरी गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेले हे दोघेजण मातासाहेब गुरुद्वारात गेले. मात्र त्यांना आत जाण्यास सेवादाराने विरोध केल्यानंतर त्यांना यापैकी एकाने पिस्तुल दाखविला. हा प्रकार गंभीर असल्याचे पाहून सेवादाराने गुरुद्वाराच्या मुख्य पुजाऱ्यास सांगितले. त्यानंतर ही माहिती मुदखेड पोलिसांना देण्यात आली. 

हेही वाचा  माणुसकीचा ओलावा आटला : चक्क मुख्याधिकाऱ्यांनी दिला, वृध्देच्या प्रेताला खांदा

पोलिस निरीक्षक सुनिल निकाळजे यांची कारवाई

पोलिस निरीक्षक सुनिल निकाळजे यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या सहकाऱ्यांसह मुगट येथील गुरुद्वारा गाठला. पोलिस आपल्या मागावर असल्याची चाहूल लागताच यातील एक जण पसार झाला. मात्र पोलिसांनी किरपालसिंग नानुसिंग सरदार (वय २४) रा. गुरुद्वारा गेट नं. चार याला ताब्यात घेतले. त्याची कसुन चौकशी केली असता त्याने आपल्याकडूल एक देशि पिस्तुलव एक राऊंड पोलिसांच्या स्वाधीन केला. त्यानंतर त्याला सोबत घेऊन पसार झालेल्या राजू हरजितसिंग जाधव (वय २३) रा. गोविंदनगर, हिंगोली नाका याचा शोध सुरु केला. त्याला रात्री गाडेगाव परिसरातून पोलिसांनी अटक केली. 

मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मातासाहेब गुरुद्वाराचे सेवादार गुलाबसिंग पुरणसिंग सरदार (वय ३८) यांच्या फिर्यादीवरुन मुदखेड पोलिस ठाण्यात किरपालसिंग सरदार आणि राजू जाधव या दोघांविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. शिंदे करत आहेत. पोलिस निरीक्षक श्री. निकाळजे आणि श्री. शिंदे यांनी या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

येथे क्लिक कराकुख्यात विक्की चव्हाण याच्यावर होते ‘एवढे’ गुन्हे,वाचा सविस्तर

घातक शस्त्र मिळण्याच्या ठिकाणाचा तपास करावा

नांदेड शहर व जिल्ह्यात गुन्हेगारांना घातक शस्त्र सहज उपलब्ध कसे होत आहेत हा चिंतेचा विषय आहे. तलवार, खंजर यासह चक्क पिस्तुल गुन्हेगारांकडे मिळत असल्याने येणाऱ्या काळात नांदेडची वाटचाल कोणत्या दिशेने जात आहे हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्‍न आहे. गुन्हेगारांकडे घातक शस्त्र येतात कुठून? याचा छडा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, दत्ताराम राठोड, डीवायएसपी अभिजीत फस्के आणि धनंजय पाटील यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांनी लावावा अशी मागणी नांदेडकरांमधून पुढे येत आहे. 
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two youths with pistols arrested in Nanded- p. i. sunil nikalje