म्हातारपणात छत्री दुरुस्तीचा मुसाभाईंना आधार

शशिकांत धानोरकर
Monday, 24 August 2020


काम करण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसले तरी म्हातारपणात आराम करावा, असे मानले जाते. पण मुसाभाई वयाची सत्तरी ओलांडूनही उदरनिर्वाहासाठी छत्री दुरुस्तीचे काम करतात. जुन्या काळातील दांड्याच्या छत्र्या दुरुस्त करणे, फाटलेल्या छत्र्या शिवून देणे, दांडे बसवून देणे आदी कामे करून ते उदरनिर्वाह करतात. सध्या दांड्यांच्या छत्र्या वापरण्याचे प्रमाण कमी होत असले तरी जुनी माणसे अद्यापही दांड्यांच्या छत्रीचा वापर करण्याला पसंती देतात. या दांडी छत्रीचा खऱ्या अर्थाने मुसाभाईंना पावसाळ्यात पोट भरण्यासाठी मोठा आधार मिळतो. फाटलेली छत्री शिवण्याचे नाजूक काम करण्यासाठी मुसाभाईंचे डोळे सत्तरी ओलांडूनही अद्यापही डोळस आहेत, हे विशेष.

तामसा, (ता. हदगाव, जि. नांदेड) : वयाची सत्तरी ओलांडून वृद्धापकाळ चालू असतानाही आराम करण्याचे टाळून छत्री दुरुस्ती करून उदरनिर्वाह करणारे तामसा (ता. हदगाव) येथील शेख मुसाभाई छत्रीवाले यांचे जीवन जगणे चालू आहे. तरुणांमध्ये कामकंटाळेपणा असण्याची अनेक कारणे ऐकावयास मिळतात. असे तरुण कुटुंबीयांसाठी, पालकांसाठी चिंतेचा विषय बनत असतात.

दुसरा छोटेखानी व्यवसाय 
पावसाची रिपरिप किंवा रिमझिम चालू असताना अडगळीला ठेवलेल्या छत्र्यांचा वापर करावा लागतो. अनेक छत्र्या नादुरुस्त असल्यामुळे त्यांना दुरुस्त करण्यासाठी मुसाभाईंची आठवण संबंधितांना होते. दांड्यांच्या नादुरुस्त छत्र्या दुरुस्त करण्याचा खर्चही मुसाभाई जेमतेमच घेतात. या छत्र्या वापरणारे बहुतेक गरीब असतात, तसेच मुसाभाईंची अपेक्षाही जेमतेमच. त्यामुळे कमी खर्चात मजबूत दुरुस्ती होण्याचा विश्वास येथे येणाऱ्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळतो. पावसाळ्यात छत्री दुरुस्ती तर एरवी गोरगरिबांना फायद्याचे ठरणारे फिरते कटलरी दुकान हा त्यांचा दुसरा छोटेखानी व्यवसाय आहे. सिझनप्रमाणे उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करणाऱ्या मुसाभाईंना निरोगी आरोग्याची साथ मिळत आहे.

हेही वाचा -  जिल्ह्यात खुनाची मालिका सुरुच : नांदेडात खंजरने भोसकुन एकाचा खून

चार पैसे मिळवणे आवश्यक
घरची गरिबी असतानाही व्यवसायातून जेमतेम मिळकत पदरी पडत असूनही त्यात समाधानी राहण्याचा मनाचा मोठेपणा त्यांनी बाळगला आहे. छत्री दुरुस्ती करून त्यांना रोज अंदाजे शंभर ते दीडशे रुपयांची मिळकत होते. लॉकडाउनमुळे पाच महिन्यांपासून मुसाभाई कामाविना घरीच आहेत. कोरोना महामारीच्या काळात वृद्धापकाळामुळे घरीच राहणे सुरक्षित असण्याचा नियम त्यांनी तंतोतंत पाळला आहे. आता जगण्यासाठी घरी राहण्याबरोबरच काम करून चार पैसे मिळवणे आवश्यक आहे. म्हणून त्यांनी दांड्यांच्या छत्र्या दुरुस्त करणे चालू केले आहे.

‘जान में जहान है’ तोपर्यंत छत्री दुरुस्ती व फिरते कटलरी दुकानाचा व्यवसाय चालू ठेवायचा आहे. थोडे कमी ऐकू येते. पण डोळे चांगले असल्यामुळे छत्र्या शिवण्याचे बारकाईचे काम व्यवस्थित होते. या वयात कमाई होणे शक्य नसले तरी पोट मात्र भरते, हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. ये सब उपरवाले की मेहेरबानी है.
- मुसाभाई

संपादन - स्वप्निल गायकवाड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Umbrella Repair In Old Age Is The Basis Of Musabhai, Nanded News