नांदेड : दहा दिवसावर आलेल्या लग्नघरचा काका- पुतन्या अपघातात ठार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 May 2020

ही घटना शुक्रवारी (ता. आठ) सकाळी पाचच्या सुमारास भोकर ते नांदेड रस्त्यावर नारवट पाटीजवळ घडली.

बारड/ भोकर (जिल्हा नांदेड) : दुचाकी व ट्रकच्या धडकेत झालेल्या भिषण अपघातात दुचाकीवरील काका- पुतन्या जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी (ता. आठ) सकाळी पाचच्या सुमारास भोकर ते नांदेड रस्त्यावर नारवट पाटीजवळ घडली. या प्रकरणी भोकर पोलिस ठाण्यात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

मुदखेड तालुक्यातील बारडपासून अगदी जवळच असलेल्या पांढरवाडी येथील आनंदा दिगांबर नव्हाते (वय ४०) आणि त्यांचा पुतन्या आकाश विश्‍वनाथ नव्हाते (वय १८) हे दोघे आपल्या दुचाकी (एमएच२६- एडब्ल्यु- १४८१) वरून शुक्रवारी (ता. आठ) पहाटे पाचच्या सुमारास भोकरला घरी असलेल्या (ता. १९ मे) रोजी लग्नाचा किराना सामान खरेदी करण्यासाठी जात होते. लॉकडाउन असल्याने सकाळी लवकरच सामान खरेदीसाठी हे काका- पुतन्या पहाटे लवरच निघाले होते. 

हेही वाचाआजीचा खून करणाऱ्या नातवाला कोठडी

भिषण अपघातात काका-पुतन्या ठार

त्यांची दुचाकी भोकर येथून दोन किलोमटर अंतरावर असताना नारवट पाटीजवळ भोकरहून नांदेडकडे येणारा ट्र्क (एमपी०९- एचएच- ७३८६) चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक हा भरधाव व निष्काळजीपणे चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीस जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने आकाश नव्हाते याचा जागीच मृत्यू झाला. तर आनंदा नव्हाते हे गंभीर जखमी झाले. 

भोकर पोलिस व बारड महामार्ग पोलिसांची धाव

ही घटना भोकर पोलिस व बारड महामार्ग पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी दुचाकीवरील काका- पुतन्या हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. महामार्ग पोलिसांनी त्यांना भोकर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र घटनास्थळी रक्तश्राव जास्त झाल्याने त्यांचा उपचार सुरू होण्यापूर्वीच आकाश नव्हाते (वय १८) याचा मृत्‍यू झाल्याचे रुग्णालय सुत्रांनी सांगितले. प्रकृती गंभीर झाल्याने आकाश नव्हाते (वय ४०) यांना नांदेडच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

येथे क्लिक करा आमचे नाही तर मुलांचे तरी स्वप्न पूर्ण करा...

भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी भोकर पोलीस ठाण्यात राजेश्‍वर नागोबा करपे, रा. धानोरा (ता. भोकर) यांच्या फिर्यादीवरुन ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. डेडेवाड करत आहेत. घटनेची माहिती मिळताच भोकरचे पोलिस निरिक्षक विकास पाटील यांनीही भेट दिली. 

लग्नाच्या दहा दिवसापूर्वी भावावर काळाचा घाला

पांढरवाडी येथील आकाश नव्हाते (वय १८) याच्या भावाचे लग्न मंगळवारी (ता. १९) मे रोजी होते. त्या लग्नासाठी लागणारे किराणा सामान आणण्यासाठी तो आपल्या काकासोबत जात होता. परंतु त्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आकाश नव्हाते हा बारड येथे एका दुकानावर काम करत होता. लग्नघरी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uncle nephewu killed in accident near Bhokar nanded news