आगामी नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा-  डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शक सूचना

प्रल्हाद कांबळे
Thursday, 1 October 2020

त्याअनुषंगाने गृह विभागाकडून काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यात साजरा होणाऱ्या या सणांबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार संपूर्ण नांदेड जिल्ह्याच्या हद्दीत खालीप्रमाणे मार्गदर्शक सूचना एका आदेशाद्वारे दिल्या आहेत.   

नांदेड : कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता येत्या 17 ऑक्टोबरपासून सुरु होणारा यावर्षीचा नवरात्रोत्सव, दुर्गापूजा, दसरा साध्या पध्दतीने साजरा करावा. त्याअनुषंगाने गृह विभागाकडून काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यात साजरा होणाऱ्या या सणांबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार संपूर्ण नांदेड जिल्ह्याच्या हद्दीत खालीप्रमाणे मार्गदर्शक सूचना एका आदेशाद्वारे दिल्या आहेत.   

मार्गदर्शक सूचना :

·  सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील.

·  कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच मा. न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.

·  या वर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षीत असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मुर्तीची सजावट त्याअनुषंगाने करण्यात यावी.

·   देवीच्या मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळांसाठी 4 फूट व घरगूती देवीच्या मुर्तीची उंची 2 फुटांच्या मर्यादेत असावी.

·  यावर्षी शक्यतो पारंपारिक देवीच्या मुर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शादूची, पर्यावरणपुरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.

·  नवरात्रौत्सवासाठी वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच “माझे कुटूंब माझी जबाबदारी” या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी.

·  गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबिरे उदा. रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याव्दारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करावी.

· आरती, भजन, किर्तन किंवा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करावे.

· देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

·  देवीच्या मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारिरीक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटाझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

· देवीचे आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतील विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मुर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये.

·  महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समिती निहाय मुर्ती स्विकृती केंद्राची व्यवस्था करावी व याबाबत जास्तीत जास्त प्रसिध्दी देण्यात यावी.

· मंडपात एकावेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपांमध्ये खाद्यपदार्थ अथवा पेय पानाची व्यवस्था करण्यास मनाई असेल.

· विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्रात असेल तर मुर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल.

·  दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून प्रतिकात्मक स्वरुपाचा असावा. रावण दहनासाठी आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील. प्रेक्षक बोलावू नयेत. त्यांना फेसबुक इत्यादी समाज माध्यमातून थेट प्रक्षेपणाव्दारे बघण्याची व्यवस्था करावी.

·  कोवीड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुर्नवसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच यानंतर प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील.

हेही वाचा -  नांदेड जिल्ह्यात पिकविमा कंपनीकडे ४५ हजार अर्ज -

या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी

या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था, अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांचे विरुध्द कार्यवाही केली जाणार नाही, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ता. 29 सप्टेंबर 2020 रोजी  निर्गमीत केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The upcoming Navratri festival should be celebrated in a simple manner- Dr. Vipin's guide nanded news