esakal | कोरोना मुक्तीसाठी लस आवश्यकच; नांदेड जिल्हा परिषद आरोग्य विभाग ः लसीकरणानंतर जिल्ह्यात एकही मृत्यू नाही

बोलून बातमी शोधा

लसीकरण
कोरोना मुक्तीसाठी लस आवश्यकच; नांदेड जिल्हा परिषद आरोग्य विभाग ः लसीकरणानंतर जिल्ह्यात एकही मृत्यू नाही
sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड ः वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लसीकरण सुरु करण्यात आले आहे. लसीकरणाचे फायदे आता दिसून येत असून जिल्ह्यात लसीकरण झालेल्या एकाही नागरिकाचा मृत्यू झाला नाही. ज्यांना कोरोना झाला त्यांनाही सौम्य लक्षणे असल्याने कोरोनावर लस हाच उपाय असल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, अजूनही अनेकांमध्ये लसीविषयी शंकाकुशंका आहेत. मार्च व एप्रिल महिन्यात कोरोनाचा कहर सुरु झाला. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशपातळीवर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी कोविशिल्ड आणि कोवॅक्सीनचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. पहिला डोस दिल्यानंतर २८ ते ३० दिवसानंतर शरीरामध्ये अॅन्टीबॉडीज तयार होतात. त्यामुळे कोरोना होण्याची शक्यता कमी होते. जिल्ह्यात आतापर्यंत लस घेतलेल्या एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नसल्याचे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - नांदेड : शांतीधाम गोवर्धन घाटावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार; नातेवाईकांना अंत्यविधी पाहता येणार

कोरोना होण्‍यापासून बचाव

नांदेड जिल्‍ह्यात ग्रामीण भागातील लोकसंख्‍या ३१ लाख ८७ हजार ३८५ तर शहराची लोकसंख्‍या सहा लाख ७७ हजार ३४५ इतकी आहे. ग्रामीण भागात दोन लाख ५५ हजार ४३ तर शहरात ६० हजार २१४ असे एकूण तीन लाख १५ हजार २५७ नागरिकांचे लसीकरण मंगळवारपर्यंत (ता.२७) झाले आहे. आतापर्यंत लस घेतलेल्‍या नागरीकांपैकी एकही जण दगावल्‍याची नोंद जिल्‍ह्यात झालेली नाही. मात्र लस घेतल्‍यानंतर काही जणांना कोरोनाची बाधा झाली. मात्र त्यांचा लसिकरणामुळे गंभीर कोरोना होण्‍यापासून बचाव झाला आहे.

पहिल्या डोसनंतर पाच टक्के पॉझिटिव्ह ः

0- पहिला डोस घेतल्यानंतर पाच टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये सुरुवातीच्या काळात फ्रंटलाईन वर्करची त्यातही आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या जास्त होती.

0- पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. दुसरा डोस घेतल्यांतर २८ दिवसांनी अॅन्टीबॉडीज तयार होतात.

0- दोन्ही डोस घेतल्यानंतरही मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग तसेच वारंवार हात धुणे आदी नियमांचे पालन करावे लागते. लसीमुळे रुग्ण गंभीर होत नाही.

कोरोनावरील लस पूर्णपणे सुरक्षित आहे. लसीमुळे रुग्णांची रोग प्रतिकारशक्ती वाढत असल्याने कोरोनाचा प्रभाव कमी होतो. रुग्ण गंभीर स्थितीत पोहचत नसल्याने जिल्ह्यात आतापर्यंत लस घेतलेल्या एकाही नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. त्यामुळे लस घेण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे.

- डॉ. बालाजी शिंदे, आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेड.

संपादन- प्रल्हाद कांबळे