भाजीपाला उत्पादनाचा मिळाला आधार

शशिकांत धानोरकर
Friday, 30 October 2020


पिंपळगाव (ता. हदगाव) येथील शेतकरी हामंद कुटुंबीयांने शेतात भाजीपाला उत्पादनातून मोठी मिळकत मिळवली असून भाजीपाल्यांचे भाव वाढल्यामुळे या परिवाराला चांगला आर्थिक फायदा होत आहे. शेतकरी दशरथ हामंद यांना पाच एकर शेती असून त्यातील दीड एकर शेतामध्ये त्यांनी कारले, गवार, दोडके, मिरचीचे उत्पादन घेण्याचे व्यवस्थित नियोजन केले.
 

तामसा, (ता. हदगाव, जि. नांदेड) : पिंपळगाव (ता. हदगाव) येथील शेतकरी हामंद कुटुंबीयांने शेतात भाजीपाला उत्पादनातून मोठी मिळकत मिळवली असून भाजीपाल्यांचे भाव वाढल्यामुळे या परिवाराला चांगला आर्थिक फायदा होत आहे. शेतकरी दशरथ हामंद यांना पाच एकर शेती असून त्यातील दीड एकर शेतामध्ये त्यांनी कारले, गवार, दोडके, मिरचीचे उत्पादन घेण्याचे व्यवस्थित नियोजन केले. त्यांचे ८० वर्षीय वडील गणपतराव, पत्नी मीराबाई यांच्यासह दशरथ हामंद हे शेतामध्ये काबाडकष्ट करून चांगल्या उत्पादनासाठी झिजत असतात. शेतात लागवड केलेला भाजीपाल्याचे व्यवस्थित उत्पादन होण्याबाबत हामंद कुटुंबीयांनी कोणतीच कसर राहणार नाही, याची काळजी केली. 

 

उत्पन्न घटून भावाने उच्चांक गाठला 
वडिलांचा पहाटेपासून ते सायंकाळी उशिरापर्यंत शेतामध्ये काम करण्याबाबत एकही खाडा होत नसतो. यावर्षी अतिपाऊस होण्यामुळे सोयाबीन, कापसाचे मोठे नुकसान झाले असून अतिवृष्टीचा फटका भाजीपाल्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बसला आहे. अतिवृष्टीमुळे बहुतेक शेतातील भाजीपाल्याचे नुकसान होण्यामुळे भाजीपाल्याचे उत्पन्न घटून भावाने उच्चांक गाठला आहे. हामंद कुटुंबियांना मात्र भाजीपाला उत्पादनाबाबत निसर्ग कोपण्याचा कमी फटका बसला. 

हेही वाचा - राज्यमंत्री डाॅ. विश्वजित कदम यांचे लवकरच प्रमोशन- अशोक चव्हाण

शेतामध्ये भाजीपाला पिकांची काळजी
मागील दोन महिन्यात दशरथ हमंद यांनी पिंपळगाव येथून भोकर येथील भाजीपाला बाजारपेठेत दररोज कारले, गवार, मिरची, दोडके नेऊन विक्री करत पाच ते सात हजार रुपये मिळविले. दोन महिन्यात हजारो रुपयांची मिळकत होऊन अजून एक ते दीड महिन्यात भाजीपाला विक्रीतून हामंद कुटुंबीय तीन ते साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत. शेतामध्ये भाजीपाला पिकांची काळजी करण्यात दशरथ यांच्या पत्नी मीराबाई यांचा मोठा वाटा आहे. सामान्य शेतकरी कुटुंब असणाऱ्या दशरथ यांच्या शेतीला त्यांचा भाऊ पांडुरंग यांचे सहकार्य मिळत असते. 

यावर्षी अतिपाऊस होण्यामुळे सोयाबीन व कापसाचे नुकसान झाले असून भाजीपाला विक्रीतून मात्र आधार मिळाला आहे. भाजीपाल्याला विक्रमी भाव मिळत आहे. ज्यामुळे निसर्ग कोपण्याचे दुःख थोडे हलके झाले आहे. वडील, पत्नी, भाऊ यांच्या सामूहिक प्रयत्नातून भाजीपाला उत्पादनातील समाधान शक्य होत आहे. असे दशरथ हामंद, शेतकरी, पिंपळगाव यांनी सांगितले. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Vegetable Got The Basis Of Production, Nanded News