
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून काँग्रेस पक्षाने माजी केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून किसान अधिकार दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्याचाच एक भाग म्हणून नांदेडला कॉँग्रेस पक्षाच्या वतीने शनिवारी (ता. ३१ ऑक्टोबर) केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी प्रतिकात्मक ट्रॅक्टर मार्च व सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या दोन्ही आंदोलनात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सहभाग नोंदवला.
नांदेड - कॉँग्रेस पक्षाने नेहमीच शेतकरी, कामगार आणि गोरगरिबांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. त्या उलट भाजप आणि मोदी सरकारने शेतकरी व कामगारविरोधी कायदे पाशवी बहूमताच्या बळावर मंजूर करून घेतले असून शेतकरी, कामगार, गोरगरिबांचे नुकसान करून त्यांना देशोधडीला लावले असल्याचा आरोप राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शनिवारी (ता. ३१ आॅक्टोंबर) केला.
केंद्र सरकारने शेतकरी व कामगारविरोधी पाशवी बहूमताच्या बळावर मंजूर करून घेतले. त्यामुळे शेतकरी व कामगार अडचणीत सापडला आहे. या सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून काँग्रेस पक्षाने माजी केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून किसान अधिकार दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्याचाच एक भाग म्हणून नांदेडला कॉँग्रेस पक्षाच्या वतीने शनिवारी (ता. ३१ ऑक्टोबर) केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी प्रतिकात्मक ट्रॅक्टर मार्च व सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या दोन्ही आंदोलनात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सहभाग नोंदवला. त्यानंतर समारोपप्रसंगी ते बोलत होते.
हेही वाचा - अवैध वाळूची चोरटी विक्री करणारे ट्रँकर पकडून १७ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त
कुठे पंतप्रधान इंदिरा गांधी तर कुठे हे मोदी?
देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून अनेक महत्वाचे निर्णय घेतले. एका रात्रीत बॅंकांचे राष्ट्रीयकरण करून आर्थिक पत उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची सुविधा झाली. तर दुसरीकडे भाजपच्या सरकारने बहुमताच्या जोरावर शेतकरी आणि कामगारांच्या विरोधात कायदा आणला. त्यामुळे कुठे पंतप्रधान इंदिरा गांधी आणि कुठे हे आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी? असा प्रश्न श्री. चव्हाण यांनी उपस्थित केला.
भाजपचे ‘हम करे सो कायदा’ धोरण
केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात कायदा आणल्यामुळे शेतकरी, गोरगरिबांचे नुकसान होणार आहे तर मोठ्या उद्योजक, उद्योगपतींना फायदा होणार असल्याचे सांगून श्री. चव्हाण म्हणाले की, मोदींनी आणलेल्या या कायद्यामुळे बाजार समित्या बंद पडण्याची शक्यता आहे तसेच शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणार नाही. शेतकरी देशोधडीला लागणार असून शेतकऱ्याचे जीवन उद्धवस्त होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बहुमताच्या जोरावर ‘हम करे सो कायदा’ धोरण राबवित असून ही बाब योग्य नाही. आता शेतकरी व जनता त्यांना उत्तर देईल, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचलेच पाहिजे - सावधान... नांदेडला वाहनांची होतेय चोरी; पोलिसांनी द्यावे लक्ष
ट्रॅक्टर मार्चनंतर सत्याग्रह आंदोलन
नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने सकाळी नऊ वाजता नवा मोंढा ते गांधी पुतळा असा प्रतिकात्मक ट्रॅक्टर मार्च काढण्यात आला. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री डी. पी. सावंत, काँग्रेसचे महानगराध्यक्ष आमदार अमर राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी खासदार सुभाष वानखेडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी आंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, उपमहापौर मसूद खान, सभापती अमितसिंह तेहरा, सभागृह नेते विरेंद्रसिंग गाडीवाले यांच्यासह पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आदी सहभागी झाले होते.