Video - नांदेडला १८ हजार ‘श्रीं’च्या मुर्तींचे संकलन

अभय कुळकजाईकर
Wednesday, 2 September 2020

नांदेडला कोरोना संसर्गामुळे यंदा भाविकांनी बाप्पाला साधेपणाने निरोप दिला. अनेकांनी गणेशाच्या मूर्ती महापालिकेच्या संकलन केंद्रावर सुपुर्द केल्या. शहरातील गोदावरी आणि आसना नदीच्या विविध नदी घाटावर आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाहणी केली. महापालिकेच्या वतीने पासदगाव आणि सांगवीला आसना नदीच्या काठावर तयार केलेल्या कृत्रिम तलावात गणेशाचे विसर्जन करण्यात आले. 

नांदेड - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात लाडक्या बाप्पाचे मंगळवारी (ता. एक) साधेपणाने विसर्जन करण्यात आले. ना मिरवणुका, ना ढोल, ना ताशा, ना कुठे गुलालाची उधळण झाली नाही. दरम्यान, नांदेड महापालिकेच्या वतीने शहरातील विविध १४ संकलन केंद्रावर भाविकांनी आपआपल्या घरचे तसेच गणेश मंडळांच्या श्रींच्या मूर्ती आणून दिल्या. दिवसभरात १७ हजार ७६५ मूर्तींचे संकलन करण्यात आले. त्याचबरोबर निर्माल्यही जमा करण्यात आले.

यंदाच्या वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी करु नये तसेच संकलन केंद्रावर मूर्ती आणून द्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन आणि महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी केले होते. त्यानुसार शहरातील सहा क्षेत्रीय कार्यालयातंर्गत विविध १४ ठिकाणी संकलन केंद्र सुरु करण्यात आले होते. त्यास भाविकांनी देखील उस्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे १७ हजार ७६५ मूर्ती तसेच निर्माल्याचेही संकलन झाल्याची माहिती महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे सहायक आयुक्त गुलाम सादेक यांनी सांगितले. 

हेही वाचा - नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपिन यांना कोरोनाची बाधा

आयुक्त, आमदारांनी केली पाहणी
दरम्यान, आयुक्त डॉ. लहाने यांनी शहरातील गोदावरी आणि आसना नदीच्या विसर्जन घाटावर जाऊन पाहणी केली. यावेळी उपायुक्त अजितपालसिंघ संधू, सहायक आयुक्त गुलाम सादेक, सहायक आयुक्त संजय जाधव, कार्यकारी अभियंता गिरीश कदम, कलीम परवेज आदी उपस्थित होते. नदीघाटावर महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यासोबत सफाई कामगार, आर ॲण्ड बी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे कामगारांसह विद्युत विभागाचे कर्मचारी, जीवरक्षकासह निर्माल्य संकलनासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आमदार बालाजी कल्याणकर यांनी देखील आसना आणि पासदगाव येथील नदीघाटावर भेट दिली. 

हेही वाचलेच पाहिजे - नांदेड रेकॉर्ड ब्रेक तब्बल ३८० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह,  सहा रुग्णांचा मृत्य
 
नदी घाटांवर आलेल्या ‘श्रीं’च्या मूर्ती 

  • आसना पासदगाव - नऊ हजार ४५५ 
  • आसना सांगवी - चार हजार ८६७ 
  • नानकसर - ८२६ 
  • नावघाट - ९१३ 
  • नगिनाघाट - ६५२ 
  • शनीघाट - १०३ 
  • शनीघाट वसरणी - २६ 
  • वसरणी घाट - ९२३ 
  • एकूण - १७ हजार ७६५

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video - Collection of 18,000 idols of 'Shree' in Nanded, Nanded news