esakal | Video - नांदेडच्या महापौरपदी कॉँग्रेसच्या मोहिनी येवनकर, उपमहापौरपदी मसूदखान
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड - महापौरपदी कॉँग्रेसच्या मोहिनी येवनकर तर उपमहापौरपदी मसूदखान यांची निवड

नांदेड वाघाळा महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणुक मंगळवारी (ता. २२ सष्टेंबर) झाली. त्यात कॉँग्रेसच्या मोहिनी विजय येवनकर या महापौर तर उपमहापौरपदी मसूदखान यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व नगरसेवकांनी त्यांचे स्वागत केले. 

Video - नांदेडच्या महापौरपदी कॉँग्रेसच्या मोहिनी येवनकर, उपमहापौरपदी मसूदखान

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - नांदेड वाघाळा महापालिकेच्या महापौरपदी कॉँग्रेसच्या मोहिनी विजय येवनकर यांची तर उपमहापौरपदी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मसूदखान यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मंगळवारी (ता. २२) सकाळी अकरा वाजता पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणुक झाली. महापौर आणि उपमहापौरपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्यामुळे बिनविरोध निवडणुक पार पडली.

नांदेड वाघाळा महापालिकेची आक्टोंबर २०१७ मध्ये निवडणुक झाली. त्यामध्ये ८१ जागापैकी कॉँग्रेसला ७३ जागा मिळाल्या. भाजपला सहा तर शिवसेना आणि अपक्ष प्रत्येकी एका जागेवर निवडून आले. कॉँग्रेसला जंबो बहुमत असल्यामुळे त्यांचाच महापौर व उपमहापौर होणार होता. त्यानुसार सुरवातीला दीड वर्ष महापौर म्हणून शीला किशोर भवरे तर उपमहापौरपदी विनय गिरडे पाटील यांची निवड झाली. त्यानंतर कॉँग्रेसच्या दीक्षा धबाले महापौर तर कॉँग्रेसचे सतिश देशमुख तरोडेकर उपमहापौर झाले. त्यानंतर कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाउन यामुळे जवळपास तीन महिने निवडणुक पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर राज्य शासनाच्या सूचनेनुसार मंगळवारी (ता. २२) निवडणुक प्रक्रिया आॅनलाइन पार पडली. 

हेही वाचा - जायकवाडीपासून पोचमपाडपर्यंतचे प्रकल्प भरले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
 

निवडणुक बिनविरोध
महापालिकेत कॉँग्रेसची सत्ता असल्यामुळे याही वेळेस कॉँग्रेसचा महापौर व उपमहापौर झाला. महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव होते. नगरसेविका मोहिनी विजय येवनकर यांनी शनिवारी (ता. १९) दुपारी महापौरपदासाठी तर उपमहापौरपदी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मसूद खान यांनी अर्ज दाखल केला होता. या दोघांचेच अर्ज आले असल्यामुळे त्यांची निवड मंगळवारी (ता. २२) सकाळी अकरा वाजता बिनविरोध होणार होती. त्यात फक्त अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी होती. महापौरपदासाठी कॉँग्रेस पक्षाकडून दहा नगरसेविकांची नावे होती. त्यात मोहिनी येवनकर यांनी बाजी मारली. त्याचबरोबर उपमहापौरपदासाठी दहाजण इच्छुक होते. त्यात ज्येष्ठ नगरसेवक मसूदखान यांनी बाजी मारली. 

आॅनलाइन निवडणुक 
महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुक प्रक्रिया पार पडली. दोघांचेच अर्ज असल्यामुळे निवडणुक बिनविरोध झाली. निवडीनंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दोघांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, नगरसचिव अजितपालसिंघ संधू यांच्यासह उपस्थिती अधिकारी, पदाधिकारी यांनी स्वागत केले. 

हेही वाचलेच पाहिजे - जिल्ह्यात लवकरच “ई-ऑफिस” कार्यपद्धतीतून प्रशासनाला गतीमान करु- डॉ. विपीन

अशोक चव्हाण यांचे मानले आभार
निवडीनंतर महापौर मोहिनी येवनकर यांनी मावळत्या महापौर दीक्षा धबाले यांच्याकडून पदभार स्विकारला. त्यानंतर उपमहापौर मसूद खान यांनी मावळते उपमहापौर सतिश देशमुख तरोडेकर यांच्याकडून पदभार स्विकारला. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, सभागृह नेते विरेंद्रसिंग गाडीवाले, माजी महापौर अब्दुल सत्तार, शैलजा स्वामी, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, माजी सभापती किशोर स्वामी यांच्यासह कॉँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी निवड केल्याबद्दल महापौर मोहिनी येवनकर आणि उपमहापौर मसूद खान यांनी आभार मानले. आमच्यावर दाखविलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू आणि सर्वांच्या सहकार्याने महापालिकेचे कामकाज करु, असा विश्वासही निवडीनंतर त्यांनी व्यक्त केला.