esakal | Video -  मधुमेहींनी कोरोनापासून अशी घ्यावी काळजी - डॉ. संतोष मालपाणी
sakal

बोलून बातमी शोधा

मधुमेहतज्ज्ञ डॉ. संतोष मालपाणी

कोरोनावर अजूनही कोणतेही रामबाण औषध नाही. मधुमेहींना कोरोना झाल्यानंतर रुग्णांनी मधुमेह नियंत्रित ठेवल्यामुळे रुग्ण बरे झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी दक्ष राहणे महत्वाचे आहे. निराश होऊन चालणार नाही तर काळजी घेऊन स्वतःला सुरक्षित ठेवणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर मधुमेह नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. 

Video -  मधुमेहींनी कोरोनापासून अशी घ्यावी काळजी - डॉ. संतोष मालपाणी

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - कोरोना नावाच्या अतिसंसर्गजन्य विषाणुमुळे जगभरात पहिल्यांदाच अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातल्या त्यात मधुमेह असलेल्या रुग्णांना कोरोनाचा संसर्ग लवकर होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी निराश न होता काळजी घेणे आणि स्वतःला सुरक्षित ठेवणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर आपला मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला नांदेडचे मधुमेहतज्ज्ञ डॉ. संतोष मालपाणी यांनी दिला आहे. 

कोरोनाचा संसर्ग जगभरातील अनेक देशांमध्ये गेल्या दोन अडीच महिन्यापासून अनेकांना झाला आहे. त्याचबरोबर मधुमेह (डायबेटीज) असलेल्या रुग्णांना कोरोनाचा संसर्ग लवकर होत असल्याचे आढळून आले आहे. जगभरात कोरोनामुळे जवळपास चार लाखाहून अधिक मृत्यू झाले असून त्यापैकी ६० टक्के मृत्यू अशा रुग्णांचे झाले आहेत की ज्यांना मधुमेह आहे. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी काळजी घेणे आवश्‍यक असल्याचे मत मधुमेहतज्ज्ञ डॉ. मालपाणी यांनी व्यक्त केले आहे.  

हेही वाचा - Video: रस्त्यांचा होता अडथळा, मग प्रसूतीसाठी बैलगाडीच आली साथीला...

का घ्यावी मधुमेहींनी काळजी...
मधुमेह झालेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती आधीच कमी झालेली असते. त्यात जुने रुग्ण असतील तर आणखीच प्रतिकार क्षमता कमी असते. दहा वर्षे जुना मधुमेह असेल तर त्यांच्या शरिरात गुंतागुंत अधिक असते. हद्‍य, किडनी, डोळे अशा अवयवामध्ये विकार असतात. कोरोनाची लागण झाली तर तो याच भागांची प्रतिकारशक्ती, कार्यक्षमता कमी करतो. त्यांची अवस्था म्हणजे आधीच दुष्काळ आणि त्यात तेरावा महिना अशी झालेली असते. त्यामुळे मधुमेह रुग्णांना काळजी घ्यावी लागते. 

मधुमेही रुग्णांनी हा घ्यावा आहार
कोरोनापासून दूर रहायचे असेल तर मधुमेह रुग्णांनी आपला मधुमेह नियंत्रित ठेवावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार, व्यायामासोबत मानसिक ताण तणाव कमी करावा. दिवसातून थोडे थोडे विभागून जेवण करावे. जेवणात भाजी, डाळीचा वापर वाढवावा. एका वेळेस भरपूर जेवल्याने शुगर वाढण्याचा धोका असतो. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाणी भरपूर प्यावे.  

मधुमेहींनी घ्यावी विशेष काळजी
मधुमेही रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. त्यामध्ये बाहेर जाताना नियमित मास्क वापरावा. दोन हात दूर राहून सामाजिक अंतर पाळावे. चेहऱ्याला सारखा हात लाऊ नये. वारंवार हात धुवावेत. पाणी भरपूर प्यावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. वारंवार मधुमेह तपासणी करावी त्यासाठी घरी ग्लुकोमीटरने तपासणी करुन नियमित नोंद ठेवावी व तपासणीच्या वेळी डॉक्टरांना दाखवावी. मधुमेहींना ताप असल्याची जाणीव कमी असते त्यामुळे तापाची तपासणीसाठी थर्मामीटर ठेवावे. रक्तदाब नियंत्रित ठेवावा. 

हेही वाचलेच पाहिजे - सोशल मीडियातून मांडली व्यथा अन् लग्नाची मिटली चिंता

रामबाण औषध कोरोनावर नाही
कोरोनावर अजूनही कोणतेही रामबाण औषध नाही. मधुमेहींना कोरोना झाल्यानंतर रुग्णांनी मधुमेह नियंत्रित ठेवल्यामुळे रुग्ण बरे झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी दक्ष राहणे महत्वाचे आहे. निराश होऊन चालणार नाही तर काळजी घेऊन स्वतःला सुरक्षित ठेवणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर मधुमेह नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. 
- डॉ. संतोष मालपाणी, मधुमेहतज्ज्ञ, नांदेड.
 

loading image