Video - परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली तरच लॉकडाउनचा निर्णय 

अभय कुळकजाईकर
मंगळवार, 7 जुलै 2020

नांदेड जिल्ह्यातील सर्व परिस्थितीचा व प्रातिनिधिक स्वरुपात समाजातील सर्व घटकांचा विचार करुनच आवश्यकता भासल्यास लॉकडाउनचा निर्णय घेण्यात येईल. नागरिकांनी कोरोनाच्या संदर्भातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले आहे. 

नांदेड - जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापारी, दुकानदारांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी मंगळवारी (ता. सात) जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांची भेट घेऊन चर्चा केली. टाळेबंदीला व्यापारी, दुकानदारांनी विरोध दर्शविला. टाळेबंदीमुळे व्यापार व व्यवसायावर परिणाम होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

कोरोनाच्या संदर्भाने नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत पोलिसांना कळविण्यात आले असून, नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसांत परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली तर मग टाळेबंदीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा - सर्वाधिक प्राधान्य जनतेच्या आरोग्य सुविधेसाठी - पालकमंत्री अशोक चव्हाण
 

व्यापारी, दुकानदारांचे शिष्टमंडळ भेटले
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी दुपारी शहर व जिल्ह्यातील विविध व्यापारी, दुकानदारांच्या संघटनांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी व्यापारी हर्षद शहा, प्रेमकुमार फेरवाणी, सुरजितसिंघ खालसा, दीपक बोधने, सुधाकर टाक, लक्ष्मीकांत माळवतकर, नरेश लालवानी, सुरेश भराडिया, दिलीप रंगनानी, दीपक खियानी, किशोर पाटणी, इंदर प्रेमचंदानी, इंदर दायमा, आनंद काबरा, सुनील खेराजानी, बिरबल यादव, विपुल मोळके, विजय परदेशी, प्रफुल्ल अग्रवाल, गणेश शक्करवार आदी उपस्थित होते. 

अद्यापपर्यंत कोणताही निर्णय नाही 
जिल्हा प्रशासनातर्फे टाळेबंदीबाबत अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. जिल्ह्यातील सर्व स्थितीचा व प्रातिनिधिक स्वरूपात सर्व घटकांचा विचार करून आवश्यकता भासल्यास निर्णय घेतला जाईल. सध्या तरी तसा कोणताही निर्णय टाळेबंदीबाबत झालेला नाही; मात्र नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - दिव्यांगाच्या विविध योजनांसाठी ‘दिव्यांग मित्र अप’ची निर्मिती

चर्चा करावी ः पालकमंत्री 
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांच्यासह अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. टाळेबंदीच्या निर्णय हा व्यापारी, दुकानदार यांच्याशी चर्चा करून घेण्यात यावा, असेही श्री. चव्हाण यांनी सुचविले. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. सहा) सायंकाळी आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यात टाळेबंदी होणार असल्याची चर्चा सुरू झाली. एकमेकांना मोबाईलवरून विचारणा झाली. सोमवारी रात्रीपासून चर्चा सुरू झाली आणि त्याची माहिती सर्वत्र पसरली. शेवटी याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी माहिती दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video - Lockdown only if the situation gets out of control, Nanded news