व्हिडीओ - कोरोना चाचणीसाठी नांदेड जिल्हा प्रशासन गंभीर नाही 

शिवचरण वावळे
Sunday, 20 September 2020

देशातील अतिसंवेदनशील जिल्ह्याची नावे जाहीर केली आहेत. यात  मराठवाड्यातील नांदेड आणि औरंगाबादचा समावेश असल्याने दोन्ही जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढविण्याच्या सूचना आरोग्य विभागाला राज्य शासनाने दिल्या होत्या. परंतु, नांदेड जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाला मात्र त्याचे काहीच गांभीर्य दिसत नसल्याचे वास्तव बघायला मिळत आहे.  

नांदेड ः आॅगस्ट महिण्यापासून जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची व मृत्यूची आकडेवारी झपाट्याने वाढत आहे. शहरातील बहुतेक शासकीय रुग्णालय आणि खासगी रुग्णालये फुल्ल झालेली आहेत. सध्या नागरिक स्वतःहून तपासणीसाठी येत असले तरी, किट नसल्याची गेटवरील पाटी बघुन त्यांना परत जावे लागत आहे.   

केंद्र सरकाराने सात सप्टेंबर रोजी सर्वेक्षण करुन देशातील अतिसंवेदनशील जिल्ह्याची नावे जाहीर केली आहेत. यात  मराठवाड्यातील नांदेड आणि औरंगाबादचा समावेश असल्याने दोन्ही जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढविण्याच्या सूचना आरोग्य विभागाला राज्य शासनाने दिल्या होत्या. परंतु, नांदेड जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाला मात्र त्याचे काहीच गांभीर्य दिसत नसल्याचे वास्तव बघायला मिळत आहे.  

हेही वाचा- लालपरी धावते, मात्र पोटासाठी सारेच थकले ​

किट नसल्याने नाना-नानी पार्कमधीव चाचणी बंद 

जिल्हा आरोग्य विभागाने २० हजार कोरोना किट्सची मागणी केली होती. किट्स मिळाल्यानंतर काही दिवसच दिवसाला दीड हजारपर्यंत कोरोना चाचण्या करण्यात येत होत्या. मात्र पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना अचानक जिल्हा आरोग्य विभागाकडून कोरोना किट्स देण्यासाठी हात आखडता घेतला जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने नाना-नानी पार्क येथे सुरु करण्यात आलेल्या कोरोना टेस्ट केंद्रावर किट्स उपलब्ध नसल्याने चाचण्या बंद ठेवण्याची वेळ आली आहे. तसा बोर्डही गेटवर लावण्यात आलेला आहे. 

अतिगंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांचीच कोरोना टेस्ट

नाना नानी पार्क येथे सुरु केलेले हे शहरातील सर्वात मोठे कोरोना चाचणी केंद्र आहे. त्यामुळे या ठिकाणी चाचणी करुन घेण्यासाठी नागरीकांच्या दूर-दूरपर्यंत दररोजच रांगा लागतात. मात्र, सध्या या केंत्रामध्ये चाचणीसाठी किट्‍स उपलब्ध नसल्यामुळे बहुसंख्य नागरिकांना परत जावे लागत आहे. जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणीची सुविधा आहे, मात्र तेथे अतिगंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांचीच कोरोना टेस्ट केली जात आहे.  

हेही वाचले पाहिजे- दत्ता बापूंनी जमिनीशी नातं कधीच तुटु दिले नाही

कोरोना चाचणी बंद असल्याचा इनकार

ज्या नागरिकांना कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत; परंतू घरातील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने कोरोना चाचणी करून घेणे सुरक्षेचे वाटते अशांना नाना नाणी पार्क, जिल्हा रुग्णालय, शासकीय रुग्णालय इतकेच नव्हे तर कुणाच्या सांगण्यावरुन सिडको येथे कोरोनाची चाचणी होत असल्याची माहिती मिळाल्याने शहरभर कोरोना चाचणीसाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. याविषयी जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्याकडे विचारणा केली असता, कोरोना चाचणी बंद असल्याचा त्यांनी इनकार केला. महापालीकेची काय परिस्थिती आहे? याबद्दल माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. महापालीकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळु शकला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video - Nanded district administration not serious for corona test Nanded News