Video - राजगृहावरील हल्ल्याचा नांदेडला विविध पक्ष, संघटनांकडून निषेध

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

मुंबईतील दादर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडी, बहुजन संघर्ष सेना, रिपब्लिकन सेना व नांदेड अभिवक्ता संघाच्या वतीने निषेध करण्यात आला असून याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.  

नांदेड : विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह निवासस्थानावर मंगळवारी (ता. सात) सायंकाळी अज्ञातांनी हल्ला केला. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी (ता. आठ) नांदेडात विविध पक्ष, सामाजिक संघटना यांच्या बुधवारी (ता. आठ) जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध केला व संबंधीत हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी केली.

राजगृहावर दोन अज्ञातांनी खिडक्यांचे तावदान, सीसीटीव्ही कॅमेरे, झाडांच्या कुंड्या आणि परिसरातील शोभेच्या वस्तूंची तोडफोड करण्यात आली आहे. या विरोधात वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्हा उत्तरचे जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर वाचनासाठी घेतलेली पुस्तके ठेवण्यासाठी राजगृह ही वास्तू बांधली असून, राजगृह म्हणजे आंबेडकरवाद्यांसाठी पवित्र स्थळ आहे. वंचित आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुख अहमद, गोविंद दळवी, कमलेश चौदंते, आयुब खान, साहेबराव बेळे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा - कोरोनाचा सामना : नांदेडात आता मिशन ब्रेक द चेन ​

विविध संस्था, संघटनेतर्फे निषेध

रिपब्लिकन सेनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष नितीन बनसोडे, भगवान कंधारे, भाऊराम कुर्तडीकर, प्रेमिला वाघमारे, विकास पकाने, मोहन लांडगे, शोभा खिल्लारे, विनायक अन्नपूर्वे व माधव झगडे यांनी निवेदन दिले. नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. मिलिंद लाठकर, उपाध्यक्ष ॲड. जगजीवन भेदे व संजय मलदांडे यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. बहुजन संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेव चिखलीकर, जिल्हाध्यक्ष भारत मगरे अशा विविध पक्ष व संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. राजगृहावर हल्लेखोरांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.   

हेही वाचलेच पाहिजे - विहिरीत टाकले ब्लिचिंग पावडर; पुढे काय झाले वाचा

आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या 

राजगृह हे केवळ विटा, वाळू, दगड मातीने बांधलेली वास्तू नसून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा एक मोठा ठेवा आहे. राजगृह म्हणजे आंबेडकर समाजाची अस्मिता आहे. ज्या समाजकंटकाने राजगृहावर हल्ला करुन आंबेडकरी जनतेच्या अस्मितेला धक्का देण्याचे कार्य केले आहे. ते अतिशय निंदनीय आहे. कोरोनामुळे देश महामारीच्या संकटातुन जात आहे. अशा परिस्थितीमध्ये अज्ञात व्यक्तीने राजगृहावर हल्ला करुन आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचे बहुजन संघर्ष सेनेच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video - Various Parties And Organizations Protest Against The Attack On Rajgriha In Nanded Nanded News