नांदेड जिल्ह्यातील गावांचा ‘गंदगीमुक्‍त भारत अभियाना’त सहभाग

अभय कुळकजाईकर
Wednesday, 12 August 2020

नांदेड जिल्ह्यातील गावस्‍तरावर स्‍वच्‍छतेसाठी ‘गंदगीमुक्‍त भारत अभियाना’ला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील सर्व गावे या अभियानात सहभागी झाली आहेत. केंद्र सरकारच्‍या जलशक्‍ती मंत्रालयाच्या वतीने कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी वैयक्तिक व सार्वजनिक स्‍वच्‍छताबाबत स्‍वभाव परिवर्तन करण्‍याच्‍या उद्देशाने हा सप्‍ताह राबविण्‍यात येत आहे. 

नांदेड - गावस्‍तरावर स्‍वच्‍छतेसाठी गंदगीमुक्‍त भारत अभियानाला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील सर्व गावे या अभियानात सहभागी झाली आहेत. येत्या ता. १५ ऑगस्‍टपर्यंत स्‍वच्‍छतेविषयी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्‍यात येणार आहेत. संपूर्ण देशभर गंदगीमुक्‍त भारत अभियान राबविण्‍यात यावे, असे निर्देश केंद्र शासनाच्‍या जलशक्‍ती मंत्रालयाने दिले आहेत.
 
प्रत्येक जिल्ह्यात गंदगीमुक्‍त भारत अभियानांतर्गत नागरिकांमध्‍ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी वैयक्तिक व सार्वजनिक स्‍वच्‍छताबाबत स्‍वभाव परिवर्तन करण्‍याच्‍या उद्देशाने हा सप्‍ताह राबविण्‍यात येणार आहे. या अभियानात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. 

हेही वाचा - नांदेडला मृत्यूदर कमी करण्यासाठी सामुहिक प्रयत्न
 

स्‍वच्‍छता विषयक प्रतिसाद नोंदविले जाणार 
ता. आठ ऑगस्‍ट रोजी या अभियानाला सुरुवात झाली असून या अभियानांतर्गत गावस्तरावर सिंगल युज प्‍लास्‍टीकचे संकलन व वर्गीकरण करणे. ग्रामपंचायत स्‍तरावर, शासकीय इमारतींची स्‍वच्‍छता, श्रमदान व रंगरंगोटी तसेच गावस्‍तरावरील स्‍वच्‍छाग्रहींमार्फत हागणदारीमुक्‍त टप्‍पा दोन बाबत रॅपिड प्रो प्रणालीच्‍या फ्री नंबर १८००१८००४०४ वरुन गावस्‍तरावरील स्‍वच्‍छता विषयक प्रतिसाद नोंदविले जाणार आहेत. 

विविध कार्यक्रमांचे आयोजन
वॉलपेंटींगव्‍दारे स्‍वच्‍छ भारत मिशन संदेश रंगविण्यात आले. बुधवारी (ता. १२) श्रमदानाव्‍दारे गावस्‍तरावर वृक्षारोपण करण्यात आले. गुरूवारी (ता. १३) इयत्‍ता सहावी ते आठवीसाठी ‘गंदगीमुक्‍त मेरा गाव’ या विषयावर ऑनलाइन पेंटींग स्‍पर्धा घेण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. १४) प्राथमिक आरोग्‍य केंद्रामध्‍ये व गावामध्‍ये स्‍वच्‍छता व फवारणीव्‍दारे सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. तर शनिवारी (ता. १५) स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत किंवा ग्रामपंचायत सभेत गावाच्‍या हागणदारीमुक्‍त टप्‍पा दोनची घोषणा करणे असे उपक्रम या सप्‍ताहात राबविले जाणार आहेत.

हेही वाचलेच पाहिजे - अभियांत्रिकी पदविकासाठी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु
 

सहभागी होण्याचे आवाहन
गावकऱ्यांनी येत्या ता. १५ ऑगस्‍टपर्यंत गावस्‍तरावर ‘गंदगीमुक्‍त भारत अभियाना’त विविध उपक्रम राबवून हे अभियान यशस्‍वी करावे. तसेच कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होण्याच्‍या दृष्‍टीने स्‍थानिक गरजा व शारिरिक अंतराच्या नियमांचे पालन करुन हा उपक्रम राबवावा, असे आवाहन जिल्‍हा परिषदेच्या अध्‍यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी व उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी दिलीप इंगोले यांनी केले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Villages in Nanded district participate in 'Gandamimukt Bharat Abhiyan', Nanded news