esakal | विनायक मेटेंचा बोलविता धनी भाजपच...कोण म्हणाले वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

माजी पालकमंत्री डी. पी. सावंत

मोठा गाजावाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचे भूमीपुजन करण्यात आले. या ठिकाणी भाजप सरकारच्या काळात एकही विट विनायक मेटे रचू शकले नाही. मग त्यांनी त्यावेळेस राजीनामा का दिला नाही? असा सवाल करतांनाच अशोक चव्हाण सारख्या मराठा समाजाची बाजू भक्कमपणे मांडणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांवर आरोप करण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला? असा प्रतिप्रश्न डी. पी. सावंत यांनी केला आहे. 

विनायक मेटेंचा बोलविता धनी भाजपच...कोण म्हणाले वाचा...

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - ज्यांनी भाजप सरकारच्या काळात शिवस्मारकाचे अध्यक्षपद भुषविले परंतु साडेतीन वर्षामध्ये या ठिकाणी एकही विट रचू शकले नाहीत. असे आमदार विनायक मेटे आज बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यांच्या तोंडून निघत असलेली भाषा ही त्यांची नसून त्यांचे बोलवते धनी हे भाजपच असल्याचा आरोप माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी केला आहे.

माजी राज्यमंत्री श्री. सावंत म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची पूर्वीपासूनच राहिली आहे. मराठा समाजाने एकजुटीने आतापर्यंत केलेल्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने केवळ पाठिंबाच नव्हे तर या आंदोलनात सहभागही घेतला आहे. माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड व मुंबई येथील आंदोलनात सहभाग घेऊन आपली भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. परंतु भाजपाचा अजेंडा हातात घेऊन कॉँग्रेसमधील नेत्यांना बदनाम करण्याचा विनायक मेटे यांचा हा डाव आहे. मराठा समाजातील युवक-युवतींना याची चांगलीच माहिती असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - ‘या’ गावात भरपूर दूध, पण दुधाचा एकही थेंब विकला जात नाही

कपिल सिब्बल यांना केली विनंती
मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकले पाहिजे, यासाठी उपसमितीचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. मुळामध्ये सर्वोच्च न्यायालयातील न्यायालयीन लढायामध्ये राज्याची भूमिका कोणती असावी हा निर्णय उपसमितीचे सर्व सदस्य मिळून एकमुखी घेत असतात. मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले पाहिजे, यासाठी भाजप सरकारच्या काळातील वकिलांची जुनीच टीम काम करत आहे. उलट कपिल सिब्बल यांच्यासारख्या ज्येष्ठ वकिलांना या टिमच्या मदतीसाठी विनंती करण्यात आली आहे.

मेटेंच्या सुचनांचे स्वागतच 
मराठा समाजाचा हा प्रश्न आक्रस्ताळपणा करून सुटणार नाही. याची जाणीव विनायक मेटे यांना असणे अपेक्षित आहे. त्यांच्या जर या न्यायालयीन लढाईसाठी काही सुचना असेल तर त्यांनी उपसमितीपुढे मांडाव्यात. त्यांच्या सुचनांचे स्वागतच करण्यात येईल. परंतु भाजपातील नेत्यांची शाबासकी मिळविण्यासाठी बेछुट व बिनपुराव्याचे आरोप करणे सोडून द्यावे, असेही श्री. सावंत यांनी यावेळी सांगितले. मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयात शासन भक्कमपणे बाजू मांडत आहे. त्यामुळेच दोन सुनावणी दरम्यान आरक्षणाला स्थगिती मिळाली नाही. ही बाब मराठा समाजासाठी दिलासादायक आहे. जर खरेच विनायक मेटे यांचे भाजपामध्ये वजन असेल तर ते वापरून त्यांनी केंद्र शासनास सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी आग्रह धरावा, असेही त्यांनी सांगितले.                             

हेही वाचलेच पाहिजे - डेटा विज्ञान कृषी क्षेत्रात क्रांती घडवू शकतो-  डॉ. पराग चिटणीस

मेटेंनी त्यावेळेस राजीनामा का दिला नाही?
मोठा गाजावाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचे भूमीपुजन करण्यात आले. या ठिकाणी भाजप सरकारच्या काळात एकही विट विनायक मेटे रचू शकले नाही. मग त्यांनी त्यावेळेस राजीनामा का दिला नाही? असा सवाल करतांनाच अशोक चव्हाण सारख्या मराठा समाजाची बाजू भक्कमपणे मांडणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांवर आरोप करण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला? असा प्रतिप्रश्न डी. पी. सावंत यांनी केला आहे.