
नांदेड वाघाळा महापालिकेत कॉँग्रेसचे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे त्यांच्याकडेच महापौर, उपमहापौरांसह इतर समित्यांची सर्व पदे आहेत. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्थायी समिती सभापतीपदासाठी कॉँग्रेसचे सभागृह नेते विरेंद्रसिंग गाडीवाले यांची निवड केली आणि त्यानुसार बुधवारी दुपारी महापौर मोहिनी येवनकर यांच्या कक्षात बैठक झाली आणि त्यात श्री. गाडीवाले यांची घोषणा करण्यात आली. त्यानंतर नगरसचिव अजितपालसिंग संधू यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आला.
नांदेड - नांदेड वाघाळा महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी कॉँग्रेसचे सभागृह नेते विरेंद्रसिंग गाडीवाले यांनी बुधवारी (ता. ३०) नगरसचिव अजितपालसिंग संधू यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे. त्यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची निवड निश्चित असून गुरूवारी (ता. ३१) सभागृहात निवडीची औपचारिकता बाकी राहिली आहे.
नांदेड वाघाळा महापालिकेत कॉँग्रेसचे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे त्यांच्याकडेच महापौर, उपमहापौरांसह इतर समित्यांची सर्व पदे आहेत. स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड झाल्यानंतर श्री. गाडीवाले यांची निवड होणार हे जवळपास निश्चित होते. सभापतीपदासाठी आठ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे आता स्थायी समितीच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
हेही वाचा - Success Story: टोकन पद्धतीने तूर लागवड; भरघोस उत्पन्नाची हमी! माहूर तालुक्यातील गोंडवडसा येथे यशस्वी प्रयोग
विरेंद्रसिंग गाडीवाले यांची निवड
त्यानंतर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यापैकी श्री. गाडीवाले यांची निवड केली आणि त्यानुसार बुधवारी दुपारी महापौर मोहिनी येवनकर यांच्या कक्षात बैठक झाली आणि त्यात श्री. गाडीवाले यांची घोषणा करण्यात आली. त्यानंतर नगरसचिव संधू यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, आमदार मोहन हंबर्डे, महापौर मोहिनी येवनकर, विजय येवनकर, माजी सभापती अमितसिंह तेहरा, किशोर स्वामी, उमेश पवळे, माजी उपमहापौर सतीश देशमुख यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.
सलग पाच वेळा नगरसेवक
नांदेड महापालिकेत तब्बल पाच वेळा (दोन वेळ शिवसेना आणि तीन वेळ कॉँग्रेस) नगरसेवक म्हणून निवडून येण्याचा विक्रम विरेंद्रसिंग गाडीवाले यांनी केला आहे. त्यांचे वडील बलवंतसिंग गाडीवाले हे देखील तीन वेळा निवडून आले आणि त्यांनी विरोधी पक्षनेते आणि महापौरपदही सांभाळले होते. वडील आणि मुलगा सलग तीन वेळा निवडून येण्याचा विक्रमही गाडीवाले यांच्या नावावर आहे. गेल्या वेळेस सलग पाच वर्षे आणि सध्याचे तीन वर्षे अशी आठ वर्षे विरेंद्रसिंग गाडीवाले यांनी सभागृह नेते म्हणून काम पाहिले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनुभवी नेते म्हणून त्यांची सभापतीपदी निवड करण्यात आली आहे.
हेही वाचलेच पाहिजे - शेतकऱ्यांसाठी चांगली बाजमी : तुर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीचे आवाहन- सुधीर पाटील
पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवू - गाडीवाले
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेड पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू. कॉँग्रेसचे आजी, माजी पदाधिकारी तसेच पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी माझी निवड केल्याबद्दल त्यांचा आभारी आहे. आत्तापर्यंतचा कामाचा अनुभव तसेच नांदेड शहराच्या विकासाच्या दृष्टीने जे जे महत्वाचे आहे, ते पूर्ण होण्यासाठी विशेष प्रयत्न करू.
- विरेंद्रसिंग गाडीवाले.