esakal | विष्णुपुरी प्रकल्पातून तेलंगणात ४७२ दलघमी पाणी गेले
sakal

बोलून बातमी शोधा

vishnupuri dam

विष्णुपुरी प्रकल्पातून तेलंगणात ४७२ दलघमी पाणी गेले

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड: गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे यंदाच्या वर्षी जून महिन्यापासून आत्तापर्यंत नऊ वेळा दरवाजे उघडावे लागले असून त्यातून तब्बल ४७२.४३ दशलक्षघनमीटर पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. हे सर्व पाणी तेलंगणात पुढे पोचमपाड येथील श्रीरामसागर धरणात गेले आहे. विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरच्या बाजूस अंतेश्वर उच्च पातळी बंधारा असून त्याची क्षमता २१.१६ दलघमी आहे. त्यावर दिग्रस बंधारा असून त्याची क्षमता ६३.५७ दलघमी आहे. दिग्रस बंधाऱ्याची खाली तीन किलोमीटरवर गोदावरी आणि पूर्णा नदीचा संगम आहे. वरील क्षेत्रात पाऊस पडला की त्याचे पाणी दरवाजे उघडून सोडावे लागते आणि ते पाणी विष्णुपुरी प्रकल्पात येते. यंदाच्या वर्षीही दमदार पाऊस गेल्या आठवड्यात दोन चार वेळा झाला आहे.

विष्णुपुरी प्रकल्पाच्या खालच्या बाजूस आमदुरा उच्च पातळी बंधारा असून त्याची क्षमता २३.२० दलघमी आहे. त्या खाली बळेगाव उच्च पातळी बंधारा असून त्याची क्षमता ४०.७८ दलघमी आहे आणि त्या खाली महाराष्ट्राच्या सीमेजवळ बाभळी बंधारा असून त्याची क्षमता ५५.४९ दलघमी आहे. सध्या न्यायालयाच्या निर्णयानुसार बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे ता. एक जुलै रोजी उघडण्यात आले आहेत. त्यामुळे हे पाणी पुढे तेलंगणात सोडावे लागत आहे. पुढे पोचमपाड येथे श्रीराम सागर हा मोठा प्रकल्प असून त्याची क्षमता दोन हजार २७ दलघमी आहे. सध्या या प्रकल्पात एक हजार ३९८ दलघमी म्हणजेच ६८ टक्के पाणीसाठा आहे. या ठिकाणी हे पाणी पोहचले असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

हेही वाचा: प्रवाशांना दिलासा! सोमवारपासून पुर्णा-अकोला डेमू लोकल रेल्वे धावणार

असा झाला विसर्ग
यंदाच्या वर्षी जून महिन्यात सुरवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे विष्णुपुरी प्रकल्प ता. १४ जून रोजी भरला. त्यामुळे दरवाजे उघडावे लागले. त्यानंतर ता. १८ जून, ता. २९ जून, ता. सहा जुलै, ता. ११ जुलै ते ता. १४ जुलै आणि ता. १६ जुलै या दिवशी प्रकल्प भरल्यामुळे दरवाजे उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करावा लागला. प्रकल्पाचे एकूण १८ दरवाजे असून त्यापैकी कधी एक तर कधी सात पर्यंत दरवाजे उघडावे लागले असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता निळकंठ गव्हाणे यांनी दिली. या प्रकल्पातून यंदाच्या वर्षी आत्तापर्यंत ४७२.४३ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती पूर नियंत्रण अधिकारी शाखा अभियंता अर्जुन शिंगणवाड यांनी दिली.

loading image