नांदेड महापालिकेत आकृतीबंधासह सातव्या वेतन आयोगाची प्रतिक्षा 

अभय कुळकजाईकर
Wednesday, 4 November 2020

नांदेड वाघाळा महापालिकेची स्थापना मार्च १९९७ मध्ये झाली. त्यास २४ वर्ष होत आहेत. तरी देखील महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना अद्याप आकृतीबंध लागू झाला नाही. गेल्या काही वर्षापासून त्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, त्यास यश मिळाले नाही. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडेही याबाबत मागणी करण्यात आली आहे.

नांदेड - नांदेड वाघाळा महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आकृतीबंध कधी लागू होणार त्याचबरोबर सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी कधी होणार? याकडे लक्ष लागले आहे. याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदनही सादर केले होते. त्यामुळे आता सर्वांनाच निर्णयाची प्रतिक्षा आहे.  

नांदेड वाघाळा महापालिकेची स्थापना मार्च १९९७ मध्ये झाली. त्यास २४ वर्ष होत आहेत. तरी देखील महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना अद्याप आकृतीबंध लागू झाला नाही. गेल्या काही वर्षापासून त्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, त्यास यश मिळाले नाही. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडेही याबाबत मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर दुसरीकडे आर्थिक संकटामुळे अजूनही महापालिकेत सातवा वेतन आयोग लागू झाला नाही. या वेतन आयोगाच्या प्रस्तावातील त्रुटी संदर्भात प्रशासनाने महापालिकेला गेल्या महिन्यात ता. १६ आॅक्टोंबरला पत्र पाठवले होते. त्याबाबत महापालिकेला अभिप्राय पाठविण्याचे निर्देशही दिले होते. त्यानुसार आयुक्तांनी लवकरच प्रशासनाला माहिती दिली जाईल, असे सांगितले होते. 

हेही वाचा - मराठवाडा पदवीधर निवडणूकीचा बिगुल वाजला; एक डिसेंबरला होणार मतदान, जिल्ह्यात १६,२७६ मतदार 

मागण्यांचे निवेदन सादर 
राज्य शासनाने महापालिकेमधील विविध पदांचा आकृतीबंध तसेच सेवा प्रवेश नियमांबाबतचा सुधारित प्रस्ताव शासनाला सादर करण्याबाबत सूचित केले होते. त्यानुसार महापालिकेतील पदांचा आकृतीबंध व सेवा प्रवेश नियमांचा विभागवार सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे आता हे सगळे कधी लागू होणार?, याकडे महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. मध्यंतरी महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वतीने करमूल्य निर्धारण अधिकारी अजितपालसिंघ संधू, कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, क्षेत्रीय अधिकारी संजय जाधव, प्रकाश गच्चे, राजेश चव्हाण आदींनी आयुक्तांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करत मागण्यांचे निवेदन सादर केले होते.

तत्काळ निर्णयाची मागणी
सगळीकडे सातवा वेतन आयोग लागू झाला पण महापालिकेला झाला नाही तसेच आकृती बंधाबाबतही तत्काळ निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली होती. ज्या प्रमाणे महापालिकेतील जवळपास ८० कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिका सभेत सभागृहाच्या अनुमतीने महापौर मोहिनी येवनकर यांनी घेऊन दिलासा दिला. त्याचप्रमाणे आता आकृतीबंध, सेवा प्रवेश नियम आणि सातव्या वेतन आयोगातही निर्णय घेऊन दिलासा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. 
 
हेही वाचलेच पाहिजे - गोकुंद्यातील महिला मंडळाच्या कोजागिरीला आले आनंदाचे उधान 

प्रश्न मार्गी लावण्याचे आयुक्तांचे आश्वासन 
महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची आकृतीबंध, सेवा प्रवेश नियम तसेच सातव्या वेतन आयोगाची मागणी रास्त असून याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असे आश्वासन आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिले होते. मात्र, त्यास पंधरा दिवसांचा कालावधी लोटला आहे. येत्या दिवाळीपर्यंत याबाबत निर्णय घेऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड करावी, अशी मागणी या निमित्ताने करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Waiting for the 7th Pay Commission in Nanded Municipal Corporation, Nanded news