जिल्ह्यातील १६५ पोल्ट्री फार्म चालकांना सतर्कतेचा इशारा, कावळ्यांच्या मृत्यूच्या अहवालाची प्रतिक्षा; बर्ड फ्ल्युचा शिरकाव नसल्याचा निर्वाळा 

शिवचरण वावळे
Thursday, 14 January 2021

जिल्ह्यात काही गावात कावळ्याचा मृत्यू झाल्यामुळे त्याचे अहवाल पुण्याहून भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. दुसरीकडे बुधवारी (ता. १३) किनवट येथील जळकेवाडी येथे कोंबड्या दगावल्याने ‘बर्ड फ्ल्यु’ची साथ असल्याची भीती व्यक्त होत आहे

नांदेड - जिल्ह्यास लागून असलेल्या परभणीमध्ये ‘बर्ड फ्ल्यु’ ने शेकडो कोंबड्या मृत झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पोल्ट्री फार्म चालकांनी धास्ती घेतली आहे. दरम्यान, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी जिल्ह्यातील १६ तालुक्यात ३२ शीघ्र कृतीदल स्थापन करण्यात आले असून जिल्ह्यातील १६५ पोल्ट्री फार्म चालकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. 

जिल्ह्यात काही गावात कावळ्याचा मृत्यू झाल्यामुळे त्याचे अहवाल पुण्याहून भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. दुसरीकडे बुधवारी (ता. १३) किनवट येथील जळकेवाडी येथे कोंबड्या दगावल्याने ‘बर्ड फ्ल्यु’ची साथ असल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात बर्ड फ्लूचा संभाव्य धोका होऊ नये, यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे पाच सदस्यांचे एक याप्रमाणे ३२ शीघ्र कृती दल पथक स्थापन करण्यात आले आहे. आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेशी आम्ही समन्वय साधून असून जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन डॉ. रत्नपारखी यांनी केले आहे.

 हेही वाचा- नांदेड - गुरुवारी कोरोना प्रतिबंधक ‘लसी’चे १७ हजार डोस उपलब्ध होणार

१६५ पोल्ट्री फार्मात अंदाजित ४५ हजार पक्षी 

शेतीला जोड धंदा म्हणून कुक्कुट पालन करणारे शेतकरी, पोल्ट्री फार्म चालकांमध्ये अफवांमुळे भीतीचे वातावरण आहे. जिल्ह्यातील ११२ पानथळ जागा, जलाशये विचारात घेतली आहेत. या जलाशयांवर शीघ्र कृती दलातील सदस्‍य स्वत: पाहणी करुन विस्थापित होणाऱ्या पक्षांकडे विशेष लक्ष ठेवून आहेत. जिल्ह्यात जवळपास १६५ पोल्ट्री फार्म असून यात अंदाजित ४५ हजार पक्षी आहेत. या पोल्ट्री फार्मच्या संपर्कात राहण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही डॉ. रत्नपारखी यांनी सांगितले. 

हेही वाचा- अर्धापुरात दोघांची गळफास घेवून आत्महत्या,तर दिव्यांगाचा कालव्यात पडून मृत्यू ​

जळकेवाडीत फक्त सात कोंबड्यांचा मृत्यू 

सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यात बर्ड फ्लूची कोणतीही घटना किंवा प्रकरण निदर्शनास आले नसून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये तसेच कुठल्याही आफवांवर विश्‍वास ठेवू नये. जिल्हा परिषद विभागाने सर्व तालुक्यात पथक नेमले आहे. किनवट तालुक्या कोंबड्या मेल्याची केवळ अफवा आहे. जळकेवाडीत फक्त सात कोंबड्या मेल्या आहेत. त्यांचे नमुने घेऊन ते पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. कावळ्यांच्या मृत्यूचा अहवाल लवकरच मिळेल. 
- डॉ. एम. आर. रत्नपारखी, उपायुक्त. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Warning to 165 poultry farm operators in the district, waiting for the report of death of crows; No bird flu outbreaks Nanded News