esakal | नांदेडमधील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले; महापालिकेचे दुर्लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

water

नांदेडमधील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले; महापालिकेचे दुर्लक्ष

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड: शहरात गेल्या दहा बारा दिवसापासून पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. काही ठिकाणी दोन चार दिवसांनी तर काही ठिकाणी तब्बल सहा दिवस पाणीपुरवठा झाला नाही. विष्णुपुरी प्रकल्पात एकीकडे शंभर टक्के पाणीसाठा असताना ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी परिस्थिती झाली असून निर्जळी घडत असल्याबद्दल नांदेडकरांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत महापालिकेने तत्काळ लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नांदेड शहराला गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प आणि आसनेच्या सांगवी येथील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा होतो. काबरानगरसह इतर पाच जलशुद्धीकरण केंद्रावरून ३७ जलकुंभाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या दहा बारा दिवसापूर्वी मुसळधार पाऊस झाला आणि विष्णुपुरी प्रकल्प भरला. त्यामुळे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करावा लागला. दरम्यान, महापालिकेच्या तेथील पंप हाऊस येथे गाळ जास्त प्रमाणात वाढल्यामुळे आणि पाणी फिल्टर होणे शक्य नसल्यामुळे पंप बंद करण्यात आले. त्यामुळे नांदेड शहराला काही ठिकाणी उशीरा तर काही ठिकाणी पाणीपुरवठाच झाला नाही. अऩेक ठिकाणी पाच सहा दिवस पाणी आले नसल्याने नागरिकांनी महापालिकेविरूद्ध संताप व्यक्त केला.

हेही वाचा: Marathwada Corona Update: मराठवाड्यात ३४० कोरोना रुग्णांची वाढ

दरम्यान, महापौर मोहिनी येवनकर यांनी तातडीची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. जोरदार पाऊस झाल्यामुळे कोटीतीर्थ येथील पंपगृहात गाळ साचल्यामुळे हा प्रकल्प दोन दिवस बंद ठेवावा लागला. त्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सर्व जलशुद्धीकरण केंद्र अद्ययावत करावीत, अशा सूचना महापौरांनी दिल्या. आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर आॅक्टोबर महिन्यापासून एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यास सांगितले आहे.

महापालिका पाणीपुरवठा स्थिती
- दोन दिवसाआड शंभर दशलक्षलीटर पाणीपुरवठा
- एकूण जलकुंभ - ४० पैकी ३७ कार्यान्वित
- जलशुद्धीकरण केंद्र - पाच
- एकूण नळजोडणी - ५८ हजार

हेही वाचा: Beed Corona Update: उतरल्यावाणी वाटलेल्या कोरोनाची दुपटीने उसळी

मुसळधार पाऊस आणि विष्णुपुरी प्रकल्पाजवळील पंपगृहात गाळ आल्याने तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा करताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता त्या दूर करण्यात आल्या आहेत. एक जलकुंभ भरण्यासाठी साधारणत चार तास लागतात. आता पाणीपुरवठा सुरळीत झाला असून बुधवारपासून नियमित एक दिवसाआड पाणीपुरवठा होईल.
- सुग्रीव अंधारे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा, नांदेड महापालिका.

loading image