esakal | दाभोलकर - पानसरे हत्येच्या तपासाचे काय? - आमदार राजूरकरांचा सवाल....
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार अमर राजूरकर

सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी ठीकच आहे पण दाभोलकर - पानसरे हत्येच्या तपासाचे काय? असा संतप्त सवाल विधान परिषदेतील कॉँग्रेसचे प्रतोद आमदार अमर राजूरकर यांचा उपस्थित केला आहे.

दाभोलकर - पानसरे हत्येच्या तपासाचे काय? - आमदार राजूरकरांचा सवाल....

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - सिनेअभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या संशयास्पद आत्महत्या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण अर्थात सीबीआय सोपविण्यात आला, हे चांगलेच आहे. पण समाजसुधारक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्या प्रकरण सीबीआय सात वर्षापासून हाताळत आहे. या दोन्ही प्रकरणात सीबीआयने काय दिवे लावले?, तपासाचे काय झाले?, असा संतप्त सवाल विधान परिषदेतील कॉँग्रेसचे प्रतोद तथा नांदेडचे महानगराध्यक्ष आमदार अमर राजूरकर यांनी उपस्थित करून सीबीआयच्या कार्यक्षमतेवरच बोट ठेवले आहे.

बुद्धीवादी व वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अनिष्ठ रुढी, परंपराविरोधात आयुष्यभर लढा दिला. समाजातील अनेक भोंदू बाबांचे त्यांनी पितळ उघडे पाडले. अशा या समाजसुधारकाची एका विशिष्ट विचारधारेने प्रभावित झालेल्या माथेफिरूंनी ता. २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी पुण्यात गोळ्या झाडून हत्या केली.

हेही वाचा - नांदेडमध्ये दररोज अडीच हजार शिवभोजन थाळींचे होते वाटप
 

‘सीबीआय’कडे तपास तरीही...
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर दीडच वर्षात महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत व कम्युनिस्ट कामगार नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांचीही या विचारधारेच्या व्यक्तींकडून कोल्हापुरात ता. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी गोळीबार करून हत्या करण्यात आली. दाभोलकर-पानसरे या दोघांच्या हत्येमुळे महाराष्ट्रात संतापाची प्रचंड लाट उसळली. या असंतोषाचे परिणाम राजकारणावरही झाले. त्यामुळे या दोन्ही हत्यांचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. त्यानंतर सीबीआयने दाभोलकर-पानसरे या दोन्ही हत्या प्रकरणांचा तपास स्वतःकडे घेतला.

अद्याप काहीही प्रगती नाही
आता यातील पहिल्या घटनेला सात वर्षे तर दुसऱ्या घटनेला पाच वर्षे झाली असून सीबीआय तपासात अद्याप काहीही प्रगती झालेली दिसत नसल्याचा आरोप आमदार राजूरकर यांनी केला आहे. ही दोन्ही प्रकरणे हातावर असतांना आता सिनेअभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या तपासाची जबाबदारी पुन्हा एकदा सीबीआयकडे सोपविण्यात आली, हे विशेष.

हेही वाचलेच पाहिजे - नांदेड जिल्ह्यात संततधार पावसामुळे उडीद, मुगाला फुटले मोड

तपास करायला आणखी किती वर्षे 
अभिनेता सुशांतसिंह याच्या आत्महत्येला आता दोन महिने झाले. या काळात राजकारण चांगलेच शिगेला गेले आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंहच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी सीबीआयकडे वर्ग करण्यास मंजूरी दिली. आता सीबीआय या प्रकरणाचा तपास करायला आणखी किती वर्षे लावील याचा नेम नाही. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला, हे चांगलेच झाले. पण अगोदरच सीबीआयकडे सोपविलेल्या दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासाचे काय? याचा तपास अद्यापही गुलदस्त्यातमध्ये का आहे? असा संतप्त सवाल विधान परिषदेतील प्रतोद आमदार अमर राजूरकर यांनी उपस्थित केला आहे. आधी दाभोलकर-पानसरेंच्या मारेकऱ्यांना शोधून काढा, मगच सुशांतसिंह आत्महत्येचे प्रकरण हाताळा, अशी मागणीही आमदार राजूरकर यांनी केली आहे.

 

loading image
go to top