जूनपूर्वीच का सतावतेय कामगारांना परिवाराची चिंता...

शिवचरण वावळे
Wednesday, 6 May 2020

तळहातावर पोट असणाऱ्या कामगारांच्या हाताला काम नसल्याने पावसाळा सुरु होण्यापूर्वीच असे हाल असतील तर, पावसाळ्यात कुटुंबाचे कसे होईल? असा प्रश्‍न या कामगारांच्या मनात धडकी भरवून जात आहे.

नांदेड : कामगार, मजूर म्हटले की अंग मेहनतीची कामे करणारा वर्ग. हाताला काम आले तरच त्याच्या घरची चुल पेटते. अशा कामगारांची संख्या मोठ्या संख्येने आहे. परंतु त्यांची कुठेही नोंद नाही. त्यामुळे त्यांचे प्रश्न मांडणार कोण? हा प्रश्न आहे. लॉकडाउनची घोषणा होऊन ४३ दिवसाचा कालावधी पूर्ण झाला आहे. या दरम्यान, ज्यांच्याकडे राशन कार्ड आहे. त्यांनाच स्वस्त धान्य दुकानदाराकडून धान्य मिळाले. परंतू ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही. त्यांचे हाल सुरु आहेत.

तळहातावर पोट असणाऱ्या कामगारांच्या हाताला काम नसल्याने पावसाळा सुरु होण्यापूर्वीच असे हाल असतील तर, पावसाळ्यात कुटुंबाचे कसे होईल? असा प्रश्‍न या कामगारांच्या मनात धडकी भरवून जात आहे. एरवी बिगारी कामगारांच्या लोढ्यांनी गजबजलेले चौक विशेषतः तरोडा नाका (शेतकरी चौक) येथे रोज अडीचशे ते तिनशे मजुर कामाच्या शोधात थांबलेले असतात. परंतु मागील ४३ दिवसापासून लॉकडाउन असल्याने या चौकात एकही माणूस दिसत नाही. पोलीस बंदोबस्त असल्याने शेतकरी चौक कामगारांविना सुनासुना वाटत आहे.

 हेही वाचा- अबब...! कांद्याच्या ट्र्कमध्ये ३४ लाखाचा गुटखा

कामगारांवर उपासमारीची वेळ

‘कोरोना’मुळे देशात लॉकडाऊन सुरु आहे. लहान मोठे दुकान, व्यवसायिक, खोदकाम, गवंडीकाम, हमालीची कामे बंद आहेत. यामुळे गाव आणि शहरातील कामगार वर्गावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. कामगार चौकातील मजुरांच्या जागी आता पोलीसांचा पहारा असल्यामुळे कामगारांनी शेतकरी चौकाऐवजी कॅनॉलरोड परीसरात थांबा घेतला आहे. मात्र, त्यांना पूर्वी प्रमाणे एकत्र जमता येत नाही. म्हणून हे कामगार एकमेकापासून अंतर राखून सकाळी सकाळी कामाच्या शोधात थांबलेले दिसून येतात.

हेही वाचा- नांदेडला दिलासा : बुधवारी ५३ नमुने अहवाल निगेटिव्ह

हाताला काम धंदा नाही

तासनतास थांबून देखील कुणीच कामासाठी विचारत नाही. त्यामुळे बिगारी कामगारांना रिकाम्या हाताने घरी परत जावे लागत आहे. लॉकडाउनची परिस्थिती आज ना उद्या संपेल, असे वाटत होते. परंतु दिवसेंदिवस लॉकडाउन वाढत आहे. त्यामुळे शहरातील कामगारांना नाक्यापर्यंत पोहचता येत नाही. त्यांची नेहमीची जागा बदलल्यामुळे हाताला काम धंदा मिळत नाही. त्यामुळे बिगारी कामगार मेटाकुटीला आले आहेत.

  
कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा?
पंधरा दिवसापूर्वी एक दिवस सिमेंट, गजाळीचे खाली करण्याचे काम लागले होते. त्यामुळे यापुढे असेच सुरु राहणार, असे वाटत होते. मात्र तसे झाले नाही. एकट्याच्या जीवावर घराची जबाबदारी असल्याने पुन्हा कधी काम लागेल? असे वाटत आहे. ऐन सिझनमध्ये दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. तेव्हा पावसाळ्यात कुटुंब कसे पोसायचे? पावसाळ्यात कशी कामे करायची अन कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा? असा गंभीर प्रश्न पडला आहे.  
- दाऊ सुर्यवंशी, कामगार. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why Are The Workers Worried About The Family Before June Nanded News