अबब...! कांद्याच्या ट्र्कमध्ये ३४ लाखाचा गुटखा

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 6 मे 2020

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी सिडको भागातील दूध डेअरी परिसरात बुधवारी (ता. सहा) सकाळी केली. यावेळी ट्रक चालक, मालकासह चौघांवर नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नांदेड : कांदा वाहतुक करणाऱ्या ट्रकमधून तब्बल ३४ लाखाचा विनापरवाना बंदी असलेला गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी सिडको भागातील दूध डेअरी परिसरात बुधवारी (ता. सहा) सकाळी केली. यावेळी ट्रक चालक, मालकासह चौघांवर नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संबंध जगभरात लॉकडाउन सुरू आहे. त्यातच भारतातही तिसरा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातही जिल्हा प्रशासन आणि पोलिस या लॉकडाउनची काटोकोरपणे अंमलबजावणी करताना दिसत आहेत. सर्व पोलिस यंत्रणा बंदोबस्तात असल्याचा फायदा अवैध धंदेवाले घेत आहेत. मात्र अवैध धंदेवाल्याचे काळे कारनामे पोलिसांकडून उद्धवस्त करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांची नांगी ठेचण्यासाठी पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व संबंधीत ठाणेदारांना सुचना दिल्या आहेत. 

हेही वाचा -  नांदेडला दिलासा : बुधवारी ५३ नमुने अहवाल निगेटिव्ह

ट्रक चालकासह चार जणांना अटक 

यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर हे आपल्या अधिकाऱ्यांसह स्वत: गस्तीवर आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार श्री. चव्हाण, श्री. वडजे आणि एपीआय पांडूरंग भारती यांच्या पथकातील कर्मचारी बुधवारी (ता. सहा) सिडको परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना मिळालेल्या माहितीनुसार दूध डेअरी परिसरात सापळा लावला. वरिष्ठांना याबद्दल माहिती देऊन कांदा वाहतुक करणारा ट्रक (एमएच-२६-बीई-४०६४) दूध डेअरी जवळ येताच त्यांनी थांबविला. ट्रक चालकासह चार जणांना ताब्यात घेऊन ट्रकची तपासणी केली. ट्रकमध्ये मागच्या बाजूला कांद्याचे पोते तर समोरच्या बाजूला विनापरवाना गुटखा आढळून आला. 

येथे क्लिक करा लॉकडाऊन : ४० दिवसात ६७ लाखाचा मुद्देमाल जप्त...कुठे ते वाचा...

३४ लाखाचा गुटखा व १२ लाखाचा ट्रक जप्त 

सदरचा ट्रक पोलिसांनी जप्त करून नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात लावला. अन्न सुरक्षा अधिकारी प्रविण काळे यांना बोलावून घेऊन सदर मुद्देमालाची तपासणी केली असता ट्रकमध्ये ४० पोते सागर पान मसाला आणि एसआर-१ तंबाखूचे १० पोते असा ३४ लाखाचा गुटखा व १२ लाखाचा ट्रक जप्त केला. प्रविण काळे यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात आरोपी सय्यद शकिल, इरफान खान, शेख अमीन, रीजवान खान आणि पप्पु यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. थोरात करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking Gutkha worth Rs 34 lakh in an onion truck nanded news