नांदेड दक्षिणमधील प्लॉटधारक का आहेत आत्मदहनाच्या तयारीत, वाचा सविस्तर

प्रल्हाद कांबळे
Sunday, 30 August 2020

नांदेड शहरालगत 13 गावांमधील 232 गटांवर मोठ्या संख्येने आरक्षणे प्रस्तावित केले आहेत. हे आरक्षण तात्काळ रद्द करावे, अन्यथा आम्ही आत्मदन करू,

नांदेड : नांदेड शहर प्रस्तावित विकास आराखडा हा ऑगस्ट 2019 मध्ये नगररचना विभाग, विशेष घटक यांनी जाहीर केला. त्यात नांदेड शहरालगत 13 गावांमधील 232 गटांवर मोठ्या संख्येने आरक्षणे प्रस्तावित केले आहेत. हे आरक्षण तात्काळ रद्द करावे, अन्यथा आम्ही आत्मदन करू, असा इशारा संघर्ष समितीने आ. मोहन हंबर्डे यांच्यासह जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

नांदेड दक्षिण परिसराचा विचार करता, प्रस्तावित आरक्षणे हे प्रामुख्याने लहान आकाराच्या 1000 व 1200 स्क्वेअर फूट प्लॉटवर मोठ्या प्रमणात दर्शविले आहेत. त्यात गुंठेवारी प्लॉट, अकृषिक प्लॉट, घरे व वस्ती याचे प्रमाण फारच अधिक आहे. त्यामुळे नगररचना विभागाला एकूण प्राप्त आक्षेपांपैकी  नांदेड दक्षिणमधून प्लॉटधारक याची संख्या जास्त आहे. हे प्लॉट सामान्य नागरिक, नोकरदार (कोरोनायोद्धा) आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, भारतीय सैनिक, नांदेड मनपा कर्मचारी, शिक्षक यांचे गुंठेवारी व अकृषिक प्लॉट आहेत. हे प्लॉट त्यांनी बॅंकेकडून कर्ज काढून, आयुष्यभराची कमाई त्यात टाकून, वेळप्रसंगी आईचे-पत्नीचे दागिने विकून खाजगी बाजार भावने खरेदी केलेले आहेत. या सर्व अडचणी मांडताना प्लॉटधारक यांनी आमदार मोहन हंबर्डे यांना विनंती केली की, आमच्या लहान आकाराच्या प्लॉटवरील आरक्षण रद्द करा नाहीतर आम्हाला आत्मदहन केल्याशिवाय आमच्यासमोर दुसरा कोणताही मार्गच नाही. तसे आत्मदहनाचे निवेदन सुद्धा काही प्लॉटधारक यांनी नगररचना विभाग, मा.जिल्हाधिकारी, मा. पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड यांना दिले आहे.

हेही वाचा -  मुदखेड केंद्रीय प्रशिक्षण संस्थेत सीआरपीएफ खेलो इंडिया -

घराचे स्वप्न कधी साकार होणार नाही

सन 2005-06 या काळातसुद्धा नांदेड मनपाने कौठा, असर्जन, आसवदन, फतेजसिंगपूर, विष्णुपुरी या भागात  मोठ्या प्रमाणात आरक्षणे टाकली होती, त्याचा मोबदलाही अजून  सामान्य नागरिकांना मिळाला नाही आणि पुन्हा खोडसाळपणाने त्याच भागात लहान आकाराच्या प्लॉटवर आरक्षण दर्शवून कोणता विकास होणार आहे, असा प्रश्न सामान्य प्लॉटधारक विचारत आहेत. आजघडीला गोदावरी नदीपासून ते विष्णूपूरीपर्यत जमिनीला प्रति स्क्वेअर फूटला दोन ते अडीच हजार रुपये भाव आहे. एकदा प्लॉट आरक्षित झाल्यास पुन्हा सामान्य नागरिक याठिकाणी प्लॉट खरेदी करू शकणार नाहीत व आपले घराचे स्वप्न कधी साकार होणार नाही, ही चिंता त्यांच्या मनात आहे.

पालकमंत्री याबद्दल योग्य निर्णय लवकरच घेतील

या सर्व प्रश्नांवर उत्तर देताना आ. मोहन हंबर्डे यांनी सांगितले की, हा विकास आराखडा अत्यंत अन्यायकारक आहे. हा प्रश्न मी स्वतः अधिवेशनात मांडला होता. पुन्हा एकदा हा प्रश्न मी स्वतः पालकमंत्री यांच्यासमोर पुढील दोन दिवसात ठेवणार आहे आणि मला खात्री आहे की, पालकमंत्री याबद्दल योग्य निर्णय लवकरच घेतील. निवेदन देताना मोठ्या संख्येने संघर्ष समितीचे पदाधिकारी व नांदेड दक्षिण येथील सामान्य प्लॉटधारक उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why plot holders in Nanded South are preparing for self-immolation, read in detail nanded news