esakal | गुरुद्वारा बोर्डाचे दोन सदस्य का झाले निलंबित... वाचा सविस्तर 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

माता साहेब प्रकरणावरुन कारवाई, पाच जणांचा बैठकीवरच आक्षेप

गुरुद्वारा बोर्डाचे दोन सदस्य का झाले निलंबित... वाचा सविस्तर 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड :  येथील जगप्रसिद्ध असलेल्या सचखंड गुरुद्वारा बोर्डाची बैठक शनिवारी (ता. १८) जुलै रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. या बैठकीत सत्ताधारी सदस्यांच्या ठरावाला विरोध करणारे लोकनियुक्त सदस्य मनप्रीतसिंग कुंजीवाले व जगबीरसिंग शाहू यांना कायमचे निलंबित करण्याचा ठराव पारित करण्यात आला. परंतु ही बैठक आक्षेपार्ह असल्याचा दावा लोकनियुक्त सदस्य गुरमीतसिंग महाजन, मनप्रीतसिंग कुंजीवाले, जगबीरसिंग शाहू, भगिंदरसिंग घडीसाज व गुरुचरणसिंग घडीसाज यांनी केला आहे.

बोर्डाच्या कारभारावरून अंतर्गत सतत वाद उपस्थित होत असतात. गुरुद्वारा बोर्डाच्या सदस्यांची बैठक नियमानुसार तीन महिन्यातून एकदा घेणे अपेक्षित असताना अध्यक्ष व अन्य पदाधिकारी बैठक बोलावत आहेत. जूनमध्ये सदस्यांची बैठक झालेली असताना ता. १८ जुलै रोजी पुन्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला लोकनियुक्त सदस्य मनप्रीतसिंग कुंजीवाले व गुरमीतसिंग महाजन यांनी आक्षेप घेत औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. परंतु न्यायालयाने बैठकीला स्थगितीस नकार दिला. त्यामुळे ता १८ जुलै रोजी अध्यक्ष भूपिंदरसिंग मन्हास यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोर्डाच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीस १४ सदस्य उपस्थित होते. 

हेही वाचा -  नांदेड जि.प.च्या ग्रामीण रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा- 257 किमीचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग

सचखंड गुरुद्वारा बोर्ड विरुध्द मातासाहेब गुरुद्वारा प्रकरण

त्यात बोर्डाचे समन्वयक परमजितसिंह चाहाल, उपाध्यक्ष गुरविंदरसिंग वाधवा, सचिव सरदार रवींद्रसिंग बुंगई, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष सरदार गोविंदसिंग लोंगोवाला, आमदार सरदार तारासिंग, सरदार रघुजीतसिंग, सरदार गुर्दिपसिंह भाटिया, मनप्रीतसिंग कुंजीवाले, गुरुचरणसिंग घडीसाज, शार्दुलसिंग फौजी, जगबीरसिंग शाहू यांचा समावेश होता. सुरुवातीला भारतीय लष्करातील शूर जवान शहीद गुरतेजसिंग पंजाब व इतर शहिदांच्या शौर्याचा उल्लेख करीत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच त्यांच्या कुटुंबियांना बोर्डातर्फे ११ लाख रुपये देण्याचे ठरले. विषय पत्रिकेतील विषयावर चर्चा करताना गुरुद्वारा सचखंड बोर्ड विरुद्ध गुरुद्वारा माता साहिब यांच्यातील न्यायालयीन लढाई बाबत बोर्ड सदस्य मनप्रीतसिंग कुंजीवाले व सरदार जगबीरसिंग यांच्या वतीने न्यायालयात दाखल शपथपत्रात गुरुद्वारा माता साहिब हा तेजासिंग यांच्या मालकीचा आहे. गुरुद्वारा बोर्डाच्या मालकीचा नाही असा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

दोन कर्मचाऱ्यांना बढती

उपरोक्त दोन्ही सदस्यांची भूमिका गुरुद्वारा बोर्डाच्या विरोधात आहे. म्हणून कुंजीवाले व शाहूंचे सदस्यत्व कायमचे रद्द करण्याचा ठराव आवाजी मतदानाने पारीत करण्यात आला. याच विषयाशी संबंधित इंद्रजीतसिंग गल्लीवाले, गुरमीतसिंग, सरदार राजेंद्रसिंग पुजारी यांनी अशाच प्रकारे कोर्टात शपथपत्र सादर केले. त्यामुळे त्यांची भूमिकाही गुरुद्वारा बोर्डाच्या विरोधात असल्याचे नमूद करीत त्यांचा निषेध करण्यात आला. तसेच राजेंद्रसिंग पुजारी यांनी दोन कोटींच्या एका घरावर अवैध कब्जा केला. समाजात चुकीचा संदेश गेल्याचे नमूद करीत त्यांचा निषेध करण्यात आला. तसेच चरणसिंग सोडी यांना पदोन्नती देत वरिष्ठ सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात आली तर सरदार जगदीशसिंग लांगरी यांना वरिष्ठ लिपिक भरती देण्यात आली.